ठाणे - देशात सध्या 'जय श्री राम'चा नारा न देणार्यांना झुंडीने एकत्र येऊन ठार मारल्याच्या घटना घडत आहेत. या अपप्रवृत्तीच्या निषेधार्थ मुंब्रा येथे मूकमोर्चा काढण्यात आला. भर पावसात काढण्यात आलेल्या या मोर्चात मोठ्या संख्येने तरुण-तरुणी सहभागी झाले होते.
राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस जितेंद्र आव्हाड आणि शहराध्यक्ष आनंद परांजपे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच नगरसेवक शानू पठाण यांच्या नेतृत्वाखाली मूकमोर्चा काढण्यात आला.
रविवारी झारखंडमधील सेरईकेला खारसवान जिल्ह्यातील धतकिधीह गावात तबरेज नामक युवकाची हत्या करण्यात आली होती. या आधीही मोहसीन शेख, अखलाक अशा घटना घडल्या आहेत. या घटनांचा निषेध करण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले. दारूल फलाह मशिदीलगत हा मूक मोर्चा काढण्यात आला होता.
यावेळी शानू पठाण यांनी सांगितले की, रामाचे नाव घेऊन झुंडशाही करणार्यांनी रामाला बदनाम करु नये. मोदी सरकारने 'सबका साथ, सबका विकास आणि सबका विश्वास' असा नारा दिला होता. मात्र, आज कायदा हातात घेऊन विशिष्ट समुदायाला ठार मारले जात आहे. जर अशा पद्धतीने कायदा हातात घेतला जात असेल तर शांतताप्रिय भारतीयांना या देशात राहणे जिकीरीचे होणार आहे, असे पठाण म्हणाले.
पंतप्रधान मोदी यांनी तीन तलाकबाबत जसा कायदा केला. तसाच कडक कायदा झुंडशाहीच्या विरोधात करावा. या कायद्यान्वये झूंडीने नागरिकांच्या हत्या करणार्यांवर खटला जलदगती न्यायालयात चालवून या समाजकंटकांना फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी केली.