ठाणे: लहानपणी कुटुंबीयांनी दिलेले एक छोटेसे गिफ्ट विलास घाटे यांचे राजेश खन्नांचे जबरा फॅन होण्याचे कारण ठरले. विलास घाटे मूळचे मुंबईकर आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून ठाण्यात वास्तव्यास आहेत. सुपरस्टार राजेश खन्ना यांच्या हजारो चाहत्यांमध्ये त्यांच्या आईचाही समावेश होता. वयाच्या दहाव्या वर्षी वाढदिवसाला लहानपणी विलास यांना दुर्मिळ स्टॅप गोळा करणे, शिवकालीन नाण्यांचा संग्रह करण्याबरोबरच राजेश खन्नांच्ये विविध फोटो, कलाकृती व त्यासंबधीत कात्रणे गोळा करण्याचा छंद जडला. हळूहळू राजेश खन्ना यांचे एक, दोन नव्हे तर ५ हजारहून अधिक कलेक्शन त्यांनी गोळा केले आहे.
वाढदिवसाची भेट: आज ठाण्यातील लुईसवाडी येथील त्यांचे घर एक छोटेखानी म्युझियमच बनले आहे. ते चित्रपटसृष्टीत येण्यापूर्वी म्हणजे १९६५ पासून २०१२ मध्ये ते जगाचा निरोप घेईपर्यंतच्या काळातील सर्व घटना आणि घटनाक्रम विलास घाटे यांना तोंडपाठ आहेत. घाटे यांच्या घरात अनेक गोष्टी आहेत, ज्या राजेश खन्ना यांच्या घरातही सापडल्या नसत्या. आता तर राजेश खन्नांचे 'आशिर्वाद' हे घरही उरले नसल्याची खंत ते व्यक्त करतात. राजेश खन्ना यांचा फोटो आणि स्वाक्षरी असलेले रंगीत पोस्टकार्ड वाढदिवसाची भेट म्हणून त्यांना दिले होते. १०० रुपयाच्या नोटेवर राजेश खन्ना यांची स्वाक्षरी आहे. पुढे शक्ती सामंता यांचा कॅमेरामन रॉबिन कार आणि राजेश खन्ना यांचे निकटवर्तीय भुपेश रसीन यांच्याशी योगायोगाने झालेल्या ओळखीमुळे घाटे यांची राजेश खन्ना यांच्याशी गट्टी जमली.
गिनीज बुकात नोंद करण्यासाठी धडपड: राजेश खन्ना यांच्याशी लग्नानंतर डिंपल हिने एका पोस्टरवर 'डिंपल खन्ना' अशी केलेली दुर्मिळ स्वाक्षरी घाटे यांच्या संग्रही आहे. विलास घाटे यांच्या संग्रहाबद्दल इंग्रजी वृत्तपत्रातील बातमी वाचून राजेश खन्ना यांनी 'वफा' चित्रपटाच्या 'ऑडिओ रिलीज' पार्टीचे निमंत्रण दिले. त्यावेळी 'आशीर्वाद बंगल्यात म्युझियम उभारायचे आहे. त्यात तुम्हालाही सहभागी करून घेईन,' असे राजेश खन्ना यांनी सांगितल्याची आठवण ते सांगतात. यामुळे २०१८ साली त्यांना लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डने सन्मानित करण्यात आले. पडद्यावरील तसेच पडद्यामागील राजेश खन्ना यांच्यावरील साहित्याचा संग्रह गेली ५४ वर्षे करीत असल्याने आता ते गिनीज बुकात नोंद करण्यासाठी धडपडत आहेत.
परफेक्ट स्केल असलेला चेहरा: राजेश खन्ना अँनाटॉमीमध्ये परफेक्ट स्केल असलेला चेहरा असल्याचे निरिक्षण घाटे नोंदवतात. सलमानखानचे वडील दोन वर्ष राजेश खन्नाच्या घरी राहीले होते. याचा आवर्जुन उल्लेख घाटे करतात. त्यांनी ' मी पाहिलेला राजेश खन्ना' हे एकपात्री टॉक शो ही घाटे यांनी केला. पुन्हा हा उपक्रम सुरू करण्याचा मानस ते व्यक्त करतात. विलास घाटे यांचा 'खन्नाज खजाना' या नावाने चॅनल आहे. ज्यावर काकाजीवर प्रेम असलेल्या चाहत्यांना आणखी राजेश खन्ना समजतात. राजेश खन्नांबद्दल लोकांचे अनेक गैरसमज आहेत. ते आढ्यताखोर, अहंमन्य, अहंकारी, स्तुतीप्रिय होते, असे अनेक आरोप त्यांच्यावर होते. प्रत्यक्षात तसे नव्हते, असेही आवर्जून घाटे सर्वांना सांगतात.
काय आहे घाटेंकडे कलेक्शन: घाटेंकडे मराठी ,इंग्रजी, हिंदी भाषांतील जवळपास पाच हजार लेख आणि मुलाखतींची कात्रणे तसेच राजेश खन्ना यांची स्वाक्षरी आहेत. त्यांच्या १६५ पैकी १३० चित्रपटांच्या सीडी किंवा डीव्हीडी, त्यांच्या चित्रपटांतील गाण्यांच्या असंख्य रेकॉर्ड व कॅसेट आहेत. 'आनंद' मधील संवाद असलेली एलपी रेकॉर्ड आहे. या संग्रहासाठी घाटेंनी हजारो रुपये आणि शेकडो तास खर्च केले आहेत. त्याला त्यांच्या पत्नी व कुटुंबातील सदस्यांनीही मोलाची साथ मिळाल्यामुळेच हे शक्य झाले, असे घाटे सांगतात. हा दुर्मिळ संग्रह त्यांच्या घरी येऊन कुणीही कधीही पाहु शकतो.
प्रेम चोपडांची घाटेंच्या वडीलांमुळे एन्ट्री: प्रेम चोपडा यांची फिल्म इंडस्ट्रीमध्ये घाटेंच्या वडीलांमुळे एन्ट्री असे ते सांगतात. विलास घाटे यांचे वडील राजा घाटे हे देखील आर्ट स्कूलमध्ये हुबेहूब चित्र काढतात. पूर्वीच्या ब्लेक अँड व्हाईट फोटो जमान्यात उपकार सिनेमासाठी राजेश खन्ना यांना वेळ मिळत नव्हता. मग राजा घाटे यांनी काढलेल्या फोटोमुळे प्रेम चोपडा यांना पहिला सिनेमा मिळाला आणि इंडस्ट्रीला प्रेम चोपडा मिळाले.