ठाणे - नवी मुंबईमधील न्यायालयातून जामीन मिळाल्यानंतर राज ठाकरे ठाण्यात आले होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी बोलताना केंद्र आणि राज्य सरकारला चांगलेच धारेवर धरले. ठाण्यात राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांची बैठक घेऊन पक्षाची पडझड नवीन नियुक्त्या आणि काही पक्ष प्रवेश यांच्या बाबतीत चर्चादेखील केली. यावेळी त्यांनी पत्रकारांशी बोलताना राज्यातल्या आणि केंद्राच्या सरकारवर टीका केली.
अयोध्येला जायची तारीख निश्चित नाही -
मी अयोध्येला जायचे ठरवले आहे. पण तारीख अद्याप निश्चित नाही. अशी माहिती राज ठाकरे यांनी दिली. तसेच दोन्ही सरकार सारखेच असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला. शेतकरी आंदोलनाच्या बाबतीतही राज ठाकरे यांनी भाष्य केले. नवे कृषी कायदे बरोबर असून त्यात काही त्रुटी आहेत, असेही ते म्हणाले. वीज बिलावरूनही राज्य सरकारला चांगलेच धारेवर धरले. सरकारने राज्यात लूट माजवली आहे. मिळेल त्या मार्गाने सरकार नागरिकांना ओरबडण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप यावेळी राज ठाकरे यांनी केला. तसेच राज्यात वीज वरून नागरिकांमध्ये मोठा रोष असताना अदानी शरद पवार यांची भेट घेतात आणि हा विषय लांबणीवर पडतो. या बाबतीतही त्यांनी मिश्कीलपणे उत्तर दिले.
औरंगाबादच्या नामांतरावर केवळ राजकारण -
राज्यात व केंद्रात सत्तेत असताना भाजपाने औरंगाबादच्या नामांतराचा विषय का मंजूर केला नाही, असा सवाल राज ठाकरे यांनी यावेळी उपस्थित केला. नामांतराच्या नावाने निवडणुकीच्या तोंडावर असे विषय काढून केवळ राजकारण सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला.
मामलेदार मिसळचाही घेतला आस्वाद -
राज ठाकरे यांनी ठाण्यात आल्यानंतर शासकीय विश्रामगृहात ठाण्याची प्रसिद्ध अशी मामलेदार मिसळ मागवून तिचा आस्वाद घेतला. यासोबत त्यांच्या सहकाऱ्यांना ही मिसळ खाण्यासाठी दिली. राज ठाकरे यांनी आधीही मामलेदार मिसळ येथे जाऊन मिसळ खाण्याचा आस्वाद घेतला होता.
हेही वाचा - चालत्या रेल्वेत चढण्याचा प्रयत्न करणाऱ्या दिव्यांगाचे आरपीएफ जवानाने वाचविले प्राण