नवी मुंबई - पनवेल आणि नवी मुंबई शहरात सलग तिसऱ्या दिवशी जोरदार पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे शहरातील सखल भागात पाणी साचले असून, नवी मुंबई व पनवेल शहरातील रस्त्यांना नद्यांचे स्वरूप प्राप्त झाले आहे.
मागील 24 तासात नवी मुंबईत सरासरी 220.60 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. तर बेलापूरमध्ये 227 मीमी, नेरूळमध्ये 228 मीमी, वाशीमध्ये 176 मीमी, कोपरखैरणेमध्ये 217 मीमी, ऐरोलीमध्ये 253 मीमी पावसाची नोंद झाली आहे. गेल्या तीन दिवसात नवी मुंबई परिसरात 678.42 मीमी पावसाची नोंद झाली आहे. मोरबे धरण परिसरात 92 मीमी पावसाची नोंद झाली आहे. सतत पडणाऱ्या पावसामुळे मोरबे धरणाची पाणी पातळी वाढण्याची शक्यता आहे. गेल्या 24 तासात 11 ठिकाणी झाडे व फांद्या कोसळल्याच्या घटना घडल्या आहेत. पावसामुळे नागरिकांनी घरात थांबणे पसंत केले आहे.
दरम्यान, मुंबईत गेले दोन दिवस जोरदार पाऊस झाला. 48 तासात अतिवृष्टी होईल, असा इशारा हवामान खात्याने दिला होता. त्यानुसार मुंबई आणि उपनगराच्या परिसरात पावसाने हजेरी लावली. काही ठिकाणी रस्त्यांवर साचलेल्या पाण्यामुळे वाहतूक वळवण्यात आली होती. हवामान खात्याने पुढील 24 तासात रेड अलर्टचा इशारा दिला आहे.