ठाणे - डोंबिवली रेल्वेस्थानकातील कल्याण दिशेकडील १९८० च्या सुमारास बांधलेला चाळीस वर्षे जुना पादचारी पूल कमकुवत झाला आहे. त्यामुळे हा कमकुवत आणि अरुंद पूल पाडण्यात येणार आहे. पूल पाडल्यानंतर नव्या पुलाची उभारणी लवकरच होणार असून त्याचे लोकार्पण अवघ्या तीन महिन्यात होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
गेल्यावर्षी एल्फिन्स्टन रेल्वे पुलावर प्रवाशांची चेंगराचेंगरी झाल्यानंतर रेल्वे प्रशासनाकडून सर्वच रेल्वे स्थानकावरील पुलांची पाहणी करण्यासाठी समिती नेमली होती. या समितीने पाहणी करून डोंबिवली रेल्वे पूल गरजेच्या मानाने खूपच अरुंद असून तो पाडून रुंद पूल बांधण्याची शिफारस केली. त्यानुसार रेल्वे प्रशासनाने हा पूल पाडण्याचा निर्णय घेतला.
कल्याणच्या दिशेकडील साडेचार मीटरचा अरुंद पूल चाळीस वर्षांपूर्वीचा असून या पुलावर प्रचंड गर्दी असते. त्यामुळे साडेचार फूटाचा हा पूल पाडून दुप्पट नऊ मीटरचा रुंद पूल बांधण्यात येणार आहे. पुलाच्या कामासंदर्भात सर्वे पूर्ण झाला असून निविदा देखील काढण्यात आली आहे, अशी माहिती डोंबिवलीचे स्टेशन प्रबंधक के. ओ. अब्राहम यांनी दिली. पुलाच्या बांधकामासाठी लागणारी क्रेन उपलब्ध होताच कामाला सुरूवात होईल, असे ही ते म्हणाले.
जुन्या पुलाचे तोडकाम सुरू असताना तसेच नवीन पूल बांधण्याच्या दरम्यान प्रवाशांनी स्थानकावरील मधल्या मोठ्या पुलाचा वापर करावा, असे आवाहनही त्यांनी केले. पुलाचे काम सुरू झाल्यावर डोंबिवली पूर्व-पश्चिम येथील कल्याणच्या दिशेकडील रिक्षा स्टँडमागे हलवण्यात येईल. तसेच येत्या आठवड्यातच पुलाच्या बांधकामाला सुरूवात होईल आणि पुढील ३ महिन्यातच हा पूल प्रवाशांसाठी खुला करण्यात येईल, अशी माहिती अब्राहम यांनी दिली.