ठाणे - संचारबंदीत रस्त्यांवर विनाकारण फिरणाऱ्या महिलांवर देखील कारवाई करण्यात येत असल्याचे चित्र भिवंडीत पाहायला मिळाले. या महिलांना चक्क उठाबशा काढण्याची शिक्षा देण्यात आली. या शिक्षेमुळे विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्या महिलांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
कोरोनाचा वाढता प्रसार टाळण्यासाठी संचारबंदी घोषित करून राज्य सरकारला एक महिना उलटून गेला. मात्र, काही लोकं आजही विनाकारण फिरताना दिसल्याने पोलिसांकडून कारवाई करण्याबरोबरच चोप देखील दिला जातो. आता तर संचारबंदीत रस्त्यावर विनाकारण फिरणाऱ्या महिलांवरदेखील कारवाई करण्यात येत असल्याचे चित्र भिवंडीत पाहायला मिळाले आहे.
शनिवारी शांतीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत रस्त्यावर विनाकारण फिरणाऱ्या महिलांना शांतीनगर पोलीस ठाण्याच्या महिला पोलीस उपनिरीक्षक सुप्रिया जाधव यांनी चक्क उठबशा काढायला लावल्या. महिला पोलिसांच्या या कारवाईमुळे आता रस्त्यावर अत्यावश्यक कामांच्या नावाने विनाकारण फिरणाऱ्या महिलांमध्ये देखील खळबळ उडाली आहे.