ठाणे - गुरुवारी ओबीसी व भटकेविमुक्तांचे नेते हरिभाऊ राठोड यांच्या नेतृत्वात ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. ओबीसीमधील अतिमागासांना मिळणाऱ्या आरक्षणाचे फायदे आज पर्यंत मिळाले नाहीत. परिणामी, राज्यातील बारा बलुतेदार समाज मोठ्या प्रमाणात विकासापासून दूर राहिला आहे. त्यामुळे या बलुतेदारांना स्वतंत्र 4 टक्के आरक्षण देण्यात यावे, या मागणीसाठी लाक्षणिक उपोषण करण्यात येणार होते. मात्र, कोरोनामुळे प्रशासनाने परवानगी नाकारल्याने बलुतेदारांनी निदर्शने केली.
आंदोलनाचा इशारा
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गुरव, कुंभार, कासार, मिस्त्री, लोहार, न्हावी, पांचाळ, धोबी, शिंपी, सोनार, वाडी - खाती, सोनार-बंजारा समाजातील नागरिकांनी घोषणा दिल्या. “आरक्षण आमच्या हक्काचे.. नाही कोणाच्या बापाचे”, 4 टक्के स्वतंत्र आरक्षण मिळायलाच हवे, अशा घोषणा यावेळी दिल्या गेल्या. यावेळी हरीभाऊ राठोड यांनी सांगितले की, राज्यातील बारा बलुतेदार समाजाला सध्या 19 टक्के आरक्षण आहे, परंतु या 19 टक्के आरक्षणामध्ये त्यांना कुठलाही लाभ मिळत नाही, कारण ओबीसी मधल्या ज्या पुढारलेल्या जाती आहेत, त्या संपूर्ण आरक्षणाचे लाभ उचलत आहेत. म्हणून 19 टक्के आरक्षणातून वेगळे 4 टक्के स्वतंत्र आरक्षण द्यावे. अन्यथा, मराठा आणि धनगर समाजाने पुकारलेल्या आंदोलनापेक्षा अधिक तीव्र आंदोलन महाराष्ट्रात छेडले जाईल, असा इशारा हरिभाऊ राठोड यांनी दिला.