ठाणे- केंद्र सरकारने देशभरात नागरिकत्व संशोदन सुधारणा कायदा लागू केला. मात्र, हा कायदा देशात हिंदू-मुस्लिम असा भेदभाव निर्माण करून संविधानाचे कलम १४ चे उल्लघंन करणारा आहे, असा आरोप करत आज (शुक्रवारी) शहरातील हजारो आंदोलनकर्ते पालिका मुख्यालयासमोरील धर्मवीर आनंद दिघे चौकात एकत्र आले होते. यावेळी केंद्र शासनाच्या निर्णयाचा निषेध करण्यात आला.
हेही वाचा- अफगाणिस्तान : हिंदुकुश पर्वत रांगांमध्ये ६.३ रिश्टर स्केलचा भूकंप, उत्तर भारतातही जाणवले धक्के
दुपारी ३ ते ५ वाजेपर्यंत केंद्र शासनाविरोधात घोषणाबाजी करीत तीव्र आंदोलन केले. या आंदोलनात युवक, महिला व शालेय मुलांसह हजारो मुस्लिम नागरिक सहभागी झाले होते. आजच्या आंदोलनाचे गांभीर्य लक्षात घेऊन शहर वाहतूक शाखेने विशेष अधिसुचना काढून शहरात ठाणे, कल्याण व अन्य ठिकाणाहून येणाऱ्या एसटी, केडीएमटी व टीएमटी बसेसना शहरात प्रवेश बंद होता. त्यांना नदी नाका, चावींद्रा, वडपे, रांजणोली नाका तसेच नारपोली येथूनच माघारी परतण्याचे निर्देश देण्यात आले होते. तर मुस्लिम बांधवांचा शुक्रवार हा नमाजाचा विशेष दिवस असल्याने बहुतांश मुस्लिम मोहल्ल्यातील दुकाने, बाजारपेठ बंद ठेवण्यात आली होती.
यावेळी शांततेत आंदोलन केल्यानंतर सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास आंदोलक आपल्या घराच्या रस्त्याकडे शांततेत परतले. मात्र, ठिकठिकाणी चार तास वाहतूक कोंडी झाल्याने प्रवाशांचे हाल झाले. दरम्यान कोणताही अनुचीत प्रकार घडू नये, यासाठी भिवंडी पोलीस उपायुक्त राजकुमार शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.