ठाणे - कल्याणच्या आधारवाडी भागात असलेल्या कारागृहातील कैद्यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. एकीकडे कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असल्याने शासनाने कोरोनाचे निर्बंध शिथिल केले आहेत. अशातच पुन्हा कल्याणच्या कारागृहात २० कैद्यांना कोरोनाची लागण झाली. त्यांना ठाणे येथील सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
नवीन कैद्यांसाठी शेजारील डॉन बॉस्को शाळेत व्यवस्था -
एकीकडे शहरात घडणाऱ्या विविध गुन्ह्यातील गुन्हेगारांना नियमित कारागृहात पाठवले जात नाही. तर दुसरीकडे बाहेरून येणाऱ्या कैद्यांमुळे कारागृहातील कैद्यांना कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून नवीन कैद्यांची व्यवस्था कारागृहाच्या बाहेरच करण्याचा निर्णय आधारवाडी कारागृह प्रशासनाने एप्रिलमध्ये घेतला होता. या निर्णयाच्या आधारे नवीन कैद्यांसाठी शेजारील डॉन बॉस्को शाळेत व्यवस्था करण्यात आली आहे. शिवाय कारागृह प्रशासनाने पहिल्या लॉकडाऊनच्या दरम्यान जेलमधील कैद्यांना येण्या-जाण्यावर निर्बंध घातले आहेत. तरीदेखील यापूर्वीही ३० कैद्यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले होते.
कारागृहातील कैद्यांचे लसीकरण तरी कोरोनाची लागण -
कल्याणच्या कारागृहात 540 कैद्यांना सामावून घेण्याची क्षमता असताना त्यात तिप्पट म्हणजेच जवळपास दीड हजारच्या जवळपास कैद्यांना ठेवण्यात आले. त्यामुळे त्यांना दाटीवाटीने राहावे लागत आहे. हे कारागृह ओव्हरलोड झाल्याने नव्याने येणार्या कैद्यांना नवी मुंबईतील तळोजा कारागृहात पाठवले जात आहे. त्याचबरोबर कारागृहाची दुरुस्ती व विस्तारीकरणाचा प्रस्तावही लालफितीत अडकल्याने कारागृह प्रशासनाला तारेवरची कसरत करावी लागत आहे. शिवाय जेल प्रशासनाने आतापर्यत शेकडो कैद्यांचे कोरोना लसीचा डोस देऊन लसीकरण केले आहेत.
कोरोनाच्या भीतीने बहुतांश कैद्यांची पॅरोलवर सुटका -
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दाटीवाटीने भरलेल्या आधारवाडी कारागृहातील बहुतांश कैद्यांची पॅरोलवर सुटका करण्यात आली असली तरी अद्यापही हजारो कैदी आधारवाडी कारागृहात शिक्षा भोगत आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षित राहण्यासाठी नियम पाळणे गरजेचे आहे. कारागृहामधील कैद्यांची संख्या कमी केल्याशिवाय सुरक्षित राहणे, नियम पाळणे शक्य नसल्यामुळे काही कैद्यांची पॅरोलवर सुटका करण्यात आली आहे. तरीही कारागृहातील कैद्याची संख्या फारशी कमी झालेली नाही. नव्याने येणाऱ्या कैद्यांमुळे कारागृहातील कैद्यांना कोरोनाची लागण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.