ठाणे - पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेचा शुभांरभ गोरखपूर येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आला. या योजनेसाठी महाराष्ट्रातून मुरबाड तालुक्यातील गौतम चिंतामण पवार या शेतकऱ्याची निवड करण्यात आली होती. पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते पवार यांनी आज सन्मानपत्र स्वीकारले. पवार हे मुरबाड तालुक्यातील अल्याणी गावचे रहिवाशी आहेत.
या वर्षीच्या अर्थसंकल्पात मोदी सरकारने छोट्या शेतकऱ्यांसाठी 'पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी' योजना घोषित केली आहे. या योजनेतून शेतकऱ्यांना थेट आर्थिक मदत देण्यात येणार आहे. त्यामुळे ही योजना महत्वाची समजली जाते. या योजनेवर ७५ हजार कोटी रुपये खर्च होण्याचा अंदाज आहे. या योजनेंतर्गत लाभार्थी शेतकऱ्याला वर्षाला सहा हजार रुपये तीन हप्त्यांमध्ये देण्यात येणार आहेत.