ठाणे - भारतातील कोरोना संसर्गाच्या रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. मुंबईतील घाटकोपर परिसरात राहणारी एक महिला प्रसूतीसाठी उल्हासनगरमध्ये तिच्या बहिणीच्या घरी आली होती. मात्र, तिला प्रसूतीसाठी रुग्णालयात दाखल केले असता या महिलेची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे.
मुंबईहुन उल्हासनगरमध्ये प्रसूतीसाठी आलेल्या महिलेला कल्याण येथील रुग्णालयात दाखल केले होते. कोरोनाची लक्षणे आढळल्याने महिलेची चाचणी घेण्यात आल्यावर ती कोरोनाबाधित असल्याचे समोर आले आहे. महिला प्रसूतीसाठी उल्हासनगरमधील संभाजी चौक परिसरात राहणाऱ्या बहिणीकडे आली होती. त्यामुळे सर्व परिसर महापालिकेने सील केला आहे. तसेच महिलेच्या घरातील १० पेक्षा अधिक सदस्यांना स्वामी टेउराम धर्मशाळा येथे क्वारंटाइन करण्यात आले आहे.
दरम्यान, महाराष्ट्रामध्ये 17 हजार 974 कोरोनाबाधित असून 694 जणांचा मृत्यू झाला आहे. देशातील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा 56 हजार 342 झाला आहे, यात 37 हजार 916 अॅक्टिव्ह केस आहेत, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.