नवी मुंबई - मनपा निवडणुकांपूर्वी फोडाफोडीचे राजकारण सुरू झाले आहे, असा आरोप विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केला आहे. भाजपच्या नगरसेवकांविरोधात पोलिस बळाचा विनाकारण वापर करण्यात येत आहे. नवी मुंबईत राजकीय वातावरण गढूळ करण्याचा काही पक्षांचा प्रयत्न करत आहेत. मात्र, पोलिसांनी महाविकास आघाडी सरकारच्या दबावाखाली काम करू नये, अन्यथा भाजप आक्रमक भूमिका घेईल असा इशारा विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी दिला.
नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकांपूर्वी फोडाफोडीचे राजकारण -
नवी मुंबई महापालिका निवडणुकी पूर्वी नवी मुंबईत फोडाफोडीचे राजकारण सुरू झाले आहे. त्यामुळे भाजपचे अनेक नगरसेवक गणेश नाईक यांना सोडचिठ्ठी देत शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करत आहेत. यामुळे भाजपामध्ये अस्वस्थता पसरली आहे.
पोलिसी बळाचा वापर करून भाजप नगरसेवकांवर आणला जातोय दबाव -
पोलिसी बळाचा वापर करून भाजप नगरसेवकांवर दबाव आणला जात आहे. त्यांच्या केसेस उकरून काढत साम, दाम, दंड, भेदचा वापर राज्य सरकारने केला आहे. त्यामुळे नवी मुंबईचे राजकीय वातावरण भयभीत व गढूळ झाल आहे, असे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी म्हंटले आहे.
पोलीस प्रशासनाने पक्षपाती भूमिका घेऊ नये केली विनंती -
पोलिस प्रशासनाने कोणत्याही प्रकारची पक्षपाती भूमिका घेऊ नये अशी मागणी विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी नवी मुंबई पोलिस आयुक्तांची भेट घेत केली आहे. पोलिसांनी सरकारच्या दबावाखाली काम करू नये. नगरसेवकांवर दबाव आणून त्यांना आपल्या पक्षात घ्यायचे ही सरकारची मोडस ऑपरेंडी झाली आहे, अशी टीका यावेळी प्रवीण दरेकर यांनी केली.
पोलिसांनी दुटप्पी भूमिका घेऊ नये व सरकारच्या दबावाखाली काम करू नये. पोलिसांनी अशा प्रकारच्या भूमिका घेतल्याचे आमच्या निदर्शनास आल्यास किंवा त्यांसंदर्भात काही पुरावे मिळाल्यास भाजप आक्रमक भूमिका घेईल असा इशाराही दरेकर यांनी यावेळी दिला.
भंडारा जिल्हा रूग्णालयातील हलगर्जीपणाचीचौकशी करुन दोषींवर तात्काळ कारवाई करा -
भंडारा जिल्हा शासकीय रुग्णालयातील आजची घटना अत्यंत दुर्दैवी, क्लेशदायक असून सरकारने यांची गंभीर दखल घेऊन या प्रकरणाची तात्काळ चौकशी करण्यात यावी तसेच या प्रकारणी हलगर्जीपणा दाखविलेल्या व्यवस्थापनाची चौकशी करून संबंधित दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी आज केली आहे.