ठाणे : भिवंडी महानगरपालिकेच्या ( Bhiwandi Municipal Corporation ) महापौर निवडणूकीत ( Mayor Election Bhiwandi 2019 ) पक्षादेश झुगारून काँग्रेसच्या विरोधी गटाला मतदान करणाऱ्या १८ नगरसेवकांचे पद रद्द करण्यासाठी कॉग्रेसचे माजी महापौर जावेद दळवी ( Ex Mayor Jawed Dalavi ) यांनी कोकण विभागीय आयुक्त ( Konkan Divisional Commissioner ) यांच्याकडे लेखी तक्रार दिली होती. त्यांनतर अनेकवेळा यावर सुनावणी घेण्यात आली. आज दोन वर्षांनी कोकण आयुक्तांनी त्या १८ नगरसेवकांच्या बाजूने निकाल दिला. त्यामुळे त्यांचे नगरसेवक पद कायम राहिल्याची माहिती नगरसवेकांच्या बंडखोर गटाचे नेते तथा उपमहापौर इम्रानवली मोहंमद खान ( Deputy Mayor Imranwali Mohammad Khan ) यांनी दिली. या नगरसवेकांच्या बाजूने निकाल लागल्याने महापालिकेने समोर फटाके फोडून जल्लोष साजरा केला.
भिवंडी पालिका सभागृहात काँग्रेसचे ४७ सदस्य असल्याने काँग्रेस पक्षाचे पूर्ण बहुमत होते. मात्र, ५ डिसेंबर २०१९ रोजी झालेल्या महापौर पदाच्या निवडणूकीत काँग्रेस पक्षाच्या अधिकृत उमेदवार रिषिका राका यांच्या विरोधात काँग्रेस पक्षाच्या १८ नगरसेवकांनी बंडखोरी केली. बंडखोरांनी विरोधी कोणार्क विकास आघाडीच्या ( Konark Vikas Aghadi ) प्रतिभा पाटील यांच्या बाजूने मतदान केले. या पक्षविरोधी भूमिकेमुळे माजी महापौर जावेद दळवी यांनी कोकण विभागीय आयुक्तांकडे १९ डिसेंबर रोजी पत्र देऊन त्यांना अपात्र ठरवावे अशी मागणी केली होती. या प्रकरणी १८ फेब्रुवारी व १६ मार्च रोजी सुनावणीच्या दोन फेऱ्या झाल्या. मात्र, त्यानंतर २६ मार्च रोजी तिसरी सुनावणी देशभरात लॉकडाऊनमुळे रद्द करण्यात आली. कोरोनाचा प्रादुभाव कमी झाल्याने सर्व शासकीय कार्यालय सुरू झाले. त्यामुळे सदर प्रकरणी तात्काळ सुनावणी ठेवण्यात यावी अशी मागणी, जावेद दळवी यांनी कोकण विभागीय आयुक्तांकडे लेखी निवेदनाद्वारे केली होती.
त्या १८ नगरसेवकांचा दोन महिन्यापूर्वीच राष्ट्रवादीत प्रवेश
नगरसेवक पद वाचवण्यासाठी भिवंडी शहर महानगरपालिकेच्या १८ काँग्रेस बंडखोर नगरसेवकांनी दोन महिन्यापूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात ( 18 Congress Corporators Joined NCP ) प्रवेश केला. त्यांनतर राष्ट्रवादीचे नेते तथा मंत्री जितेंद्र आव्हाड ( Minister Jitendra Awhad ) राष्ट्रवादीत सामील झालेल्या त्या १८ नगरसेवकांचे पद वाचविण्यासाठी जोरदार फिल्डिंग लावली होती. विशेष म्हणजे काही दिवसापूर्वी शोएब गुड्डू हे कॉग्रेस जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा देऊन राष्ट्रवादीत दाखल झाले. त्यांना राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. तर, अखेर दोन वर्षाने या १८ नगरसेवकांचे पद कायम ठेवल्याच्या निर्णयामुळे कॉग्रेसला मोठा झटका लागल्याची चर्चा चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. तर १८ बंडखोर नगरसेवकांच्या बाजूने कोकण आयुक्तांनी दिलेल्या निर्णयाविरोधात काय हालचाली करणार, हे येत्या काळात समोर येणार आहे.