ठाणे - नौपाडा परिसरातील सोसायटीतील मराठी-गुजराती वादानंतर मनसैनिकांनी 'आपले घर मराठी माणसालाच विका' अशा आशयाचे फलक मनसे कार्यालयाबाहेर लावले होते. हे बॅनर महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने काढल्यामुळे मनसैनिक संतापले असून, निवडणुकीच्या तोंडावर हा वाद आणखी चिघळण्याची शक्यता आहे.
हेही वाचा - नौदल प्रवेश पूर्व परीक्षा केंद्रावर सावळागोंधळ; हजारो विद्यार्थी आठवड्यापासून ताटकळत
महापालिकेच्या या कारवाईनंतर मनसैनिकांमध्ये असंतोष आहे. 'बॅनरमध्ये कोणताही वादग्रस्त मजकूर नव्हता. परप्रांतीयांच्या अशा वागण्याचे समर्थन करणे म्हणजे मराठी माणसाला संपवण्याचे षडयंत्र आहे', अशी संतप्त प्रतिक्रिया मनसेच्या महिला उपशहर अध्यक्षा मंजुला डाकी यांनी व्यक्त केली आहे. या प्रकरणावर जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी मात्र, ठाण्यात सर्व गुण्या गोविंदाने नांदत असल्याचे सांगितले. तसेच भांडण्याची हौस असल्यास ठाण्याच्या विकासासाठी भांडा, असा टोला मनसेला लगावला आहे.
काही दिवसांपूर्वी नौपाडा परिसरातील एका सोसायटीत गुजराती व्यक्तीने मराठी मुलाला मारहाण केली होती. यामुळे शहरात मराठी विरुद्ध गुजराती वाद पेटला होता. या वादाने शहरात खळबळ उडाली होती. नौपाडा पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे घटनेची चौकशी करून हसमुख शहा यांच्यावर गुन्हा दाखल केला. यानंतर संबंधित आरोपीला अटक करण्यात आली होती. परंतु,आता न्यायालयाने शहा यांची जामिनावर सुटका केली आहे. यापूर्वीही हसमुख शहा यांच्या चारचाकीच्या धडकेत पादचारी महिलेचा मृत्यू झाला होता. त्या खटल्यातही शहा यांना एका दिवसात जामीन मजूर झाला होता.