ठाणे - कल्याण-शीळ मार्गावर एका सोमवारी (दि. 18) सायंकाळच्या सुमारास पोलीस व्हॅनला भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. या आगीत व्हॅन जाळून खाक झाली आहे. धावत्या पोलीस व्हॅनमध्ये अचानक तांत्रिक बिघाड झाल्यामुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
फटाक्यांच्या बॉक्समुळे आगीचा भडका
आग लागली त्यावेळी या पोलीस व्हॅनमध्ये 3 पोलीस कर्मचारी उपस्थित असल्याचे सांगण्यात आले. आग लागताच पोलीस कर्मचाऱ्यांनी व्हॅनमधून पळ काढल्याने मोठा अनर्थ टाळला आहे. खळबळजनक बाब म्हणजे पोलीस व्हॅनमध्ये फटक्यांचे बॉक्स असल्याने आगीने क्षणातच रौद्ररुप धारण केले होते.
उल्हासनगरमध्येही ब्रेक निकामी झाल्याने पोलीस व्हॅनला अपघात
उल्हासनगर कॅम्प क्र. 4 परिसरातील विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यासमोर उभी असलेली पोलीस व्हॅन रविवारी (दि. 17) श्रीराम चौकाकडे जात होती. व्हॅनमध्ये कर्तव्यावरील पोलीस बसले होते. पोलीस ठाण्याच्या पुढे गेलेल्या व्हॅनचे ब्रेक निकामी झाल्याचे चालकाच्या लक्षात आले. भरधाव व्हॅन बंद असलेल्या पोलीस वसाहतीच्या सरंक्षण भिंतीला जोरदार धडकली. सुदैवाने मोठी दुर्घटना टळली असून घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा कोणीही जखमी झाले नाही. मात्र, व्हॅनचे काही प्रमाणात नुकसान झाले.
पोलीस वाहनांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
एकंदरीच या लागोपाठ दोन्ही घडलेल्या घटनेमुळे पोलीस वाहनांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला. शिवाय या दोन्ही घटना पाहता पोलिसांची वाहने सुरक्षित नसून पोलिसांना नवीन वाहने देण्याची गरज असल्याचे मत यावेळी नागरिकांनी व्यक्त केले.
हेही वाचा - भरधाव ट्रकखाली चिरडून पादचारी ठार; कल्याणच्या सहजानंद चौकातील घटना