अमरावती : प्रत्येक शाळेच्या आवारात एक खास सूचनाफलक असतो. या सूचनाफलकावर कधी विद्यार्थी आणि पालकांसाठी सूचना तर अनेकदा थोर महात्म्यांचे विचार लिहिले जातात. अनेक शाळांच्या फलकांवर दिनविशेष देखील वाचायला मिळतात. अमरावती शहरापासून पंचवीस ते तीस किलोमीटर अंतरावर असणाऱ्या भातकुली तालुक्यातील उत्तमसरा या गावात जिल्हा परिषदेच्या उच्च माध्यमिक शाळेत असणारा असाच एक सूचनाफलक चर्चेचा विषय बनला आहे. शाळेत असणारा हा सूचनाफलक 'ज्ञानफलक' झालाय. गेल्या वर्षभरापासून या फलकावरील लेखनातून विद्यार्थ्यांमध्ये सामान्य ज्ञानाची भर पडत आहे. विशेष म्हणजे फलकावरील सामान्य ज्ञान विद्यार्थी दररोज आपल्या वहीमध्ये लिहीत असून आठवडाभरातील या सामान्य ज्ञानावर शाळेच्या वतीनं दर रविवारी ऑनलाईन पध्दतीनं परीक्षा घेतली जाते. हा संपूर्ण उपक्रम 'ज्ञानगंगा घरोघरी' म्हणून राबविला जात असून शाळेतील विज्ञान शिक्षिका शितल भोपाळे यांच्या संकल्पनेतून पुढे आला आहे.
फलकावर सामान्य ज्ञानाचे प्रश्न : "उत्तमसरा या गावातील उच्च माध्यमिक शाळेत इयत्ता सहावी ते दहावीपर्यंत एकूण 158 विद्यार्थी आहेत. उत्तमसरासह लगतच्या शिवनी, शिवणगाव, बैलालपूर, निंभोरा, बोरगाव आणि काटआमला या गावातील विद्यार्थी या शाळेत शिकायला येतात. सहा वर्ष मेळघाटात धारणी येथील जिल्हा परिषद शाळेत सेवा दिल्यावर शितल भोपाळे यांची गेल्यावर्षी उत्तमसरा येथील शाळेत बदली झाली. या शाळेत आल्यावर विद्यार्थ्यांना सामान्य ज्ञानाची साधी माहिती देखील नाही, हे लक्षात आल्यावर शाळेच्या आवारात असणाऱ्या सूचना फलकावर सुरुवातीला दिनविशेष लिहिण्यास सुरुवात केली. त्यानंतर हळूहळू सामान्य ज्ञानाची माहिती लिहायला सुरुवात केली. विद्यार्थ्यांना शाळेतील अभ्यासासह फलक वाचन आवश्यक करण्यात आलं. फलकावर रोज लिहिण्यात येणार्या सामान्य ज्ञानाचे प्रश्न विद्यार्थ्यांना आपल्या वहीमध्ये लिहायला सांगितलं," असं शितल भोपाळे म्हणाल्या.
स्कॉलरशिप, नवोदय परीक्षांमध्ये विद्यार्थ्यांचा सहभाग वाढला : "सूचनाफलकावर एक प्रश्न दिला जायचा आणि जे तीन विद्यार्थी पहिलं उत्तर देतील, त्यांची नावं देखील फलकावर लिहिण्यास सुरुवात केली. यामुळं विद्यार्थ्यांना देखील आनंद वाटायला लागला. या आनंदातूनच विद्यार्थी सामान्य ज्ञानाच्या अभ्यासासाठी प्रेरित झालेत," असं शितल भोपाळे 'ईटीव्ही भारत' शी बोलताना म्हणाल्या. "विशेष म्हणजे या संकल्पनेमुळं विद्यार्थ्यांचा स्पर्धा परीक्षांचा पाया मजबूत होण्यास मदत झाली. स्कॉलरशिप, नवोदय या परीक्षांमध्ये विद्यार्थ्यांचा सहभाग वाढला विशेष म्हणजे या परीक्षांमध्ये आमच्या शाळेचे विद्यार्थी उत्तीर्ण देखील झाले," असं शितल भोपाळे यांनी सांगितलं.
सुंदर अक्षरात फलक लेखन : उत्तमसरा येथील जिल्हा परिषद उच्च माध्यमिक विद्यालयाचं सौंदर्य शाळेबाहेर लावलेल्या फलकामुळं वाढलं आहे. अतिशय छान अक्षरात सामान्य ज्ञानावर आधारित माहिती, संत, थोर महात्मे, सामान्य ज्ञानाच्या ट्रिक्स, गणिताच्या सोप्या ट्रिक्स, प्रश्नमंजुषा, दिनविशेष अशा विविध माहितीचा समावेश या फलकावर नेहमीच पाहायला मिळतो. विशेष म्हणजे विद्यार्थ्यांची येता जाता या फलकावर नजर पडते. अनेक विद्यार्थी या फलकावरील माहिती आपल्या वहीत लिहून घेतात. फलक लेखनावर आधारित उत्कृष्ट वही लेखन करणाऱ्या विद्यार्थ्यांना शिक्षकांकडून बक्षीसंही दिलं जातं.
दर रविवारी परीक्षा : शालेय अभ्यासक्रमासोबतच विद्यार्थ्यांना सामान्य ज्ञानाची गोडी लागताच शाळेचे मुख्याध्यापक लोमेश खैरकर यांनी या उपक्रमाचा विद्यार्थ्यांना कायमस्वरूपी लाभ मिळावा, यासाठी दर रविवारी विद्यार्थ्यांच्या मोबाईलवर सामान्य ज्ञान परीक्षेची प्रश्नपत्रिका पाठवून त्यांची परीक्षा घेण्याचं ठरवलं. "संतोष कुरेकर, उमेश बसरे, चंद्रशेखर ब्राह्मणकर, अश्विनी झाडे, प्रतिभा नांदणे, ज्योत्स्ना हाईगले, भूषण बुरंगे, प्राजक्ता भडके या शिक्षकांच्या सहाय्यानं इयत्ता सहावी ते दहावीच्या सर्व विद्यार्थ्यांना सामान्य ज्ञान परीक्षेसाठी प्रेरित करण्यात आलं. प्रत्येक रविवारी विद्यार्थ्यांच्या मोबाईल फोनवर 25 ते 30 गुणांची ऑनलाइन परीक्षा नियमित घेण्यास सुरुवात झाली. विशेष म्हणजे केवळ आमच्याच शाळेचे विद्यार्थी नव्हे, तर लगतच्या गावातील शाळांमधील विद्यार्थी देखील ही सामान्य ज्ञान परीक्षा देण्यासाठी समोर आलेत. 'ज्ञानगंगा घरोघरी' हा उपक्रम खरोखरच यशस्वी होत असून भविष्यात विद्यार्थ्यांना या उपक्रमाचा निश्चितच लाभ मिळेल आणि ग्रामीण भागातील विद्यार्थी स्पर्धा परीक्षेसाठी तयार होतील," असं शाळेचे मुख्याध्यापक लोमेश खैरकर म्हणाले.
विद्यार्थ्यांमध्ये उत्साह : "सामान्य ज्ञानाची माहिती मिळवत असताना विद्यार्थ्यांना नियमित शालेय अभ्यासक्रमाची देखील गोडी लागली. भारतीय संस्कृती ज्ञान परीक्षेत अनेक प्रश्न हे शाळेच्या फलकावर नियमित लिहिल्या जाणाऱ्या माहितीच्या आधारावर आले होते. सामान्य ज्ञानाच्या वहीतील माहिती पाठ केली होती, तीच माहिती या परीक्षेत आली. परीक्षेत आलेले प्रश्न पाहून आपल्या शाळेतील फलकावर जे सामान्य ज्ञान लिहिलं जातं, ते किती महत्त्वाचं आहे याचं महत्त्व कळलं," असं शाळेतील इयत्ता नववीची विद्यार्थिनी किमया टाकळे 'ईटीव्ही भारत'शी बोलताना म्हणाली.
हेही वाचा