ठाणे - शहापूर तालुक्यातील वाशिंद पोलीस ठाण्याचे ५ लाख वीज देयक थकीत असल्याने महावितरणच्या अधिकाऱ्याने पोलीस ठाण्याचा वीजपुरवठा खंडित केला. त्यानंतर येथील पोलीस अधिकाऱ्याने महावितरणच्या अधिकाऱ्याला धमकी देऊन त्यांच्याशी हुज्जत घातल्याची घटना घडली आहे.
शहापूर तालुक्यातील वासिंद पोलीस ठाण्याचे ५ लाखाचे वीज देयक थकीत असल्याने या विभागातील महावितरण कंपनीचे सहायक अभियंता कटकवार यांनी ४ ते ५ वेळा पोलीस ठाण्यात जाऊन येथील पोलीस अधिकारी सुदाम शिंदे यांना वीज देयकाचा भरणा तत्काळ करण्यासाठी विनंती केली होती. मात्र पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्याने वीज देयक भरणाबाबत काहीच उत्तर दिले नाही, असे महावितरणचे सहायक अभियंता कटकवार यांनी सांगितले. त्यातच गुरुवारी दुपारी साडे अकरा वाजल्याच्या सुमारास अभियंता कटकवार हे लाईनमन कर्मचाऱ्यांसह पोलीस ठाण्याचा वीज पुरवठा खंडित करण्यासाठी गेले होते. मात्र पोलीस ठाण्यात हजर असलेल्या एका पोलीस अधिकाऱ्याने वीज पुरवठा खंडित करण्यास विरोध करून उलट महावितरण अधिकाऱ्याशी हुज्जत घालून त्यांना दमदाटी केली. तरीही महावितरण अधिकाऱ्यांनी त्या पोलीस अधिकाऱ्याच्या धमकीला न जुमानत पोलीस ठाण्याच्या वीज पुरवठा खंडित केला.
'त्या' महावितरणच्या अधिकाऱ्यालाच विचारा'
पोलीस ठाण्याचा वीजपुरवठा खंडित असल्याने येथील पोलीस कर्मचारी वीजविनाच आपले कामकाज करत असल्याचे दिसून आले आहे. याबाबत वाशिंद पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुदाम शिंदे यांच्याशी संपर्क साधला असता तुम्ही त्या महावितरणच्या अधिकाऱ्यालाच विचारा कुठला वीज पुरवठा खंडित केला. पोलीस ठाण्याचा वीज पुरवठा खंडित केला नाही, असे बोलून अधिक बोलणे टाळले आहे. यामुळे येत्या दिवसात वीज देयकावरून महावितरण व पोलीस अधिकाऱ्यामध्ये अधिक वाद होण्याची शक्यता असल्याचे दिसून आले. विशेष म्हणजे वीज देयक थकीत असल्याने पोलीस ठाण्याच्या वीज पुरवठा खंडित केल्याची जिल्ह्यातील पहिली घटना असल्याचे सांगण्यात आले आहे.
हेही वाचा - Inter State Gang Arrested : दोन कोटी रुपये लुटणाऱ्या आंतरराज्यीय टोळीस दिंडोशी पोलिसांकडून अटकेत