ठाणे- नागपूर येथून पवई येथे बीटेक प्रवेशासाठी आलेल्या मंशल चवरे या विद्यार्थ्याचा लॅपटॉप आणि शैक्षणिक कागदपत्रे रिक्षात राहिले. कागदपत्रांची बॅग हरवल्यामुळे प्रवेश कसा घ्यायचा असा प्रश्न निर्माण झाल्याने त्याची अवस्था बिकट झाली होती. ठाणेनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी अथक परिश्रमाने रिक्षा चालकाचा शोध घेऊन मंशल चवरे याला सर्व साहित्य तत्परतेने मिळवून दिले. यामुळे मंशल याला आयआयटी पवई येथे बीटेक अभ्यासक्रमाला प्रवेश घेता आला. मंशल चवरे याने ठाणे नगर पोलिसांचे आभार मानले.
नागपूर येथे रहाणारे प्रशांत आनंदराव चवरे (५०) आणि त्यांचा मुलगा मंशल चवरे २३ जुलै रोजी रोजी सायंकाळी ०७.३० वाजता आयआयटी पवई येथे प्रवेशासाठी ठाणे शहरात आले होते. चवरे त्यांच्या मुलासोबत रिक्षाने प्रवास करत असताना लॅपटॉप व शैक्षणिक कागदपत्रे असलेली बॅग रिक्षात विसरून गेले होते. यानंतर प्रशांत चवरे यांनी ठाणेनगर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक मंगेश सावंत, विजय देशमुख पोलीस निरीक्षक (गुन्हे शाखा) यांच्या मार्गदर्शनाखाली तपास करण्यात आला. ठाणेनगर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गोंधळी यांच्या नेतृत्वात विक्रम शिदे, मोहनदास धिंदळे यांनी तपास करून रिक्षाचालकाचा शोध घेतला. पोलिसांनी मंशल चवरे यांचा लॅपटॉप व शैक्षणिक कागदपत्रे असलेली बॅग शोधून त्यांना बुधवारी परत दिली. यामुळे मंशल चवरे याची प्रवेशाची अडचण दूर झाली.