ठाणे - मुंबई पोलिसांपाठोपाठ आज (मंगळवारी) ठाणे पोलिसांनीही छट पूजेला परवानगी नाकारली आहे. छट पूजेच्या दिवशी तलाव किंवा समुद्रकिनारी छट पूजा करु नका, गर्दी करु नका, तसेच छट पूजेनिमित्त कोणतेही सांस्कृतिक कार्यक्रम ठेवू नका, छट पूजा घरीच करा, असे आवाहन ठाणे पोलिसांनी केले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा आदेश काढण्यात आला आहे. अनलाॅक काळातही कलम 144 नुसार जमावबंदी आदेश लागू असल्याने पोलिसांनी ही मनाई केली आहे.
दरवर्षी सांस्कृतिक होते विविध कार्यक्रमांचे आयोजन..
छठ माता पूजा उत्सव समितीमार्फत दरवर्षी ठाण्यात मोठ्या प्रमाणात छठ पूजेचे आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. या वर्षीही छठ पूजेनिमित्त विविध पूजा कार्यक्रमांचे आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करायचे आहे. यासाठी परवानगी द्यावी, असे पत्र छठ माता पूजा उत्सव समितीने ठाणे पोलिसांच्या कापूरबावडी पोलिसांना दिले होते. मात्र, पोलिसांनी या पत्राला उत्तर देत परवानगी नाकारली असल्याचे समितीला कळवले आहे.
हेही वाचा - समुद्रकिनारी छटपूजाविषयक कार्यक्रम आयोजनावर बंदी; मार्गदर्शक सूचना जारी
या ठिकाणी होते छट पूजा -
ठाण्यात उपवन तलाव, मासुन्दा तलाव तसेच कोलशेत घाट येथे छट पूजेचे आयोजन होत असते. या ठिकाणी संगीत भजन कार्यक्रम केले जातात. मात्र, आता हे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. तसेच कोणीही गर्दी करू नये, यासाठी याठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.
आयोजकांचे आवाहन -
पोलिसांनी परवानगी नाकारल्यानंतर आयोजकांनीही नागरिकांना काळजी घ्यावी आणि यावर्षी घरातूनच सूर्य देवतेला वंदन करावे, असे आवाहन केले आहे.