ठाणे - ज्या पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत त्या पोलीस ठाण्याची हद्द सोडून दुसऱ्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत जाऊन एका पोलीस नाईकाने मटका (क्लब) चालकाकडून लाच मागितल्याचा प्रकार समोर आला आहे. त्या पोलीस कर्मचाऱ्याला १ लाख ४० हजाराची लाच स्वीकारताना तिसऱ्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत अटक करण्यात आली. प्रशात नंदकुमार चतुर्भुज (वय- ३२) असे अटक करण्याच आलेल्या पोलीस नाईकाचे नाव आहे.
उल्हासनगरच्या मध्यवर्ती पोलीस ठाण्यात पोलीस नाईक म्हणून लाचखोर चतुर्भुज हा कार्यरत होता. मात्र, तो उलहानगरातील हिल लाईन पोलीस ठाण्याच्या हद्दीत साईनाथ नगर येथे रुपेश पाटील या मटका (क्लब) चालकाकडून जुगाराच्या क्लब वर कारवाई न करण्यासाठी १ लाख ४० हजार रुपयाच्या लाचेची मागणी करत होता. गेल्या काही दिवसापासून वारंवार लाचेची मागणी करत असल्याने मटका चालक पाटील यांनी ३ ते ४ हजार रुपये देण्याची तयारी दर्शवली होती. मात्र, लाचखोर चतुर्भुज हा ठाणे गुन्हे शाखेच्या एका बड्या अधिकाऱ्याच्या नावाने त्याच्या मटका (क्लब) वर कारवाईची भीती दाखवत होता. यामुळे पाटील यांनी ५ मार्चला ठाणे लाचलुचपत विभागाकडे चतुर्भुज आणि त्या ठाणे गुन्हे शाखेच्या एका बड्या अधिकाऱ्याच्या नावाने लेखी तक्रार दाखल केली. या तक्रारीनुसार लाचलुचपत विभागच्या पथकाने शिवाजी नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शिवगंगा नगर परिसरात शनिवारी रात्री साडे आठच्या सुमारास क्लब चालक पाटील यांच्याकडून पोलीस नाईक चतुर्भुज याला १ लाख ४० रुपयांची लाच घेताना रंगेहात अटक केली.
लाचखोर पोलीस नाईक चतुर्भुज याच्यावर शिवाजी नगर पोलीस ठाण्यात लाचखोरीचा गुन्हा दाखल करून त्याला आज न्यायालयात हजर केले. यावेळी त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास ठाणे लाचलुचपत विभागाचे अधिकारी करत आहेत.