ठाणे - राज्यातील वाढत्या कोरोना संसर्गामुळे कोरोना प्रतिबंधक नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. नागरिकांनी नियम पाळावे यासाठी पोलिसांकडून जनजागृती करण्यात येत आहे. ज्यांच्याकडून नियमांची पायमल्ली होत आहे, त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येत असल्याचे दिसत आहे.
ठाणे महानगरपालिका क्षेत्रात मागील आठवडाभरापासून कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत आहे. यामुळेच प्रशासन हायअलर्टवर आहे. राज्य सरकारकडून कोरोनाबाबतच्या नियमांचे कठोरपणे पालन करा, असे आदेश आले आहेत. त्यामुळे पालिका प्रशासन पुन्हा कोरोनाशी लढा देण्यासाठी सज्ज झाले आहे. रुग्णालय, ऑक्सिजन खाटा, औषध-गोळ्यांचा साठा केला जात आहे. त्यात आता पालिका प्रशासनाने मास्क न वापरणाऱ्या आणि सामाजिक अंतर ठेवणाऱ्या लोकांवर कारवाई सुरू केली आहे. आतापर्यंत लाखो रुपयांचा दंड पालिका प्रशासनाने गोळा केला असला तरी प्रशासन नागरिकांना कोरोना बाधा होऊ नये आणि त्याचा प्रसार थांबावा यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करत आहे. मोठ्या आस्थापना दुकाने बाजारपेठांमध्ये सामाजिक अंतर असावे. यासाठी नोटीस बजावल्या जात आहेत. दंड आकारून नागरिकांना समज देण्याचा प्रयत्न होत आहे.
पोलिसांनी सुरू केली कारवाई
ठाणे पोलिसांनी आतापर्यंत 500 आस्थापना दुकानांना नोटीस दिली असून त्यांनी 28 जणांना प्रत्येकी पाचशे रुपयांचा दंडही ठोठावला आहे. बाजारपेठांमधून पोलीस, नागरिकांना स्पीकरवर आवाहनही करत आहेत. जेथे आवाहन करून लोक ऐकत नाहीत, अशा वेळी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे कामही पोलीस करत आहेत.
हेही वाचा - भिवंडीतील जिलानी इमारत दुर्घटनेप्रकरणी पालिकेच्या सहाय्यक आयुक्तांसह चौघांना अटक