नवी मुंबई - पोलिसांच्या व शासनाच्या माध्यमातून नागरिकांना घरी राहण्यासाठी आवाहन केले जात आहे. यासाठी महामार्गावर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवला जात आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र जिल्हाबंदी करण्यात आली आहे. मात्र, तरीही काही लोक गावी जात असल्याचे चित्र दिसून येत आहे.
कळंबोली येथे मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरून चक्क दुधाच्या गाडीतून दाटीवाटीने बसलेली माणसे गावी जात असल्याचे निदर्शनात आले. या सगळ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. अत्यावश्यक सेवेच्या वाहनांची तपासणी करू नका, असे पोलिसांना शासनाचे आदेश मिळाले असल्याने, काही लोक याचा फायदा घेऊन चक्क नियमांची पायमल्ली करत आहेत.
नवी मुंबई परिसरातील कळंबोली येथे मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरवर दुधाची गाडी असे लिहिलेल्या वाहनातून चक्क 14 ते 15 नागरिक दाटीवटीने बसून आपल्या सातारा, सांगली गावी जात होते. पोलिसांना नाकाबंदी करत असताना संशय आल्याने त्यांनी या दुधाच्या टेम्पोची पाहणी केली असता हा प्रकार उघडकीस आला. या वाहनात महिला व लहान मुलेही आढळून आली आहेत. यामुळे मुंबईतून पुण्याकडे जाणाऱ्या प्रत्येक वाहनांची तपासणी करण्यात येणार असल्याची माहिती कळंबोली पोलीस स्थानकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश गायकवाड यांनी दिली.
एकत्र प्रवास करू नका, जिथे आहात तिथे सुरक्षित राहा, असे आवाहन करूनही काही लोक हा नियम पायदळी तुडवत आहेत. त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याचेही वरीष्ठ पोलीस निरीक्षक गायकवाड म्हणाले.