ठाणे : शहरात सोनारांची विचारपूस करत पोलिसांनी मारहाण केल्याचा प्रकार घडला आहे. ठाणे शहरातील ब्रम्हांड परिसरात असणाऱ्या प्रगती ज्वेलर्स या दुकानात शनिवारी सकाळच्या सुमारास काही पोलिस अधिकारी आले. त्यांच्या सोबत एक दागिने चोरीतील आरोपी युवक होता. त्या युवकाने तुमच्या दुकानात चोरीचे दागिने विकल्याचा आरोप करीत साध्या वेशात आलेल्या पोलिसांनी दुकानातील कामगारांची चौकशी करण्यास सुरुवात केली. त्यांना अपेक्षित माहिती कामगार देत नाही हे बघितल्यावर पोलिसांनी एका कर्मचाऱ्याला शिवीगाळ आणि मारहाण करीत ताब्यात घेतले. त्याला पोलिस व्हॅन मध्ये बसवून ठेवले.
पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी : पूर्ण शहानिशा होत नाही तोपर्यंत त्या कर्मचाऱ्याला तिथे बसवून ठेऊन त्याला मानसिक त्रास देण्याचा आरोप ज्वेलर्सच्या मालकाने केला आहे. या संपूर्ण घटनेचा त्या कर्मचाऱ्यावर प्रचंड मानसिक तणाव निर्माण झाला असून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे. दरम्यान या घटनेच्या निषेधार्थ ज्वेलर्स संघटनेच्या पदाधिकारी आणि दुकानदारांनी पोलीस सह आयुक्तांची भेट घेत संबंधित पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. कारवाई न झाल्यास दुकाने बंद ठेवण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
वरिष्ठांनी दिले चौकशीचे आदेश : ठाणे ज्वेलर्स असोसिएशनने घेतलेल्या या आंदोलनाच्या भूमिकेनंतर सह पोलीस आयुक्त दत्ता कराळे यांनी या संपूर्ण प्रकाराची चौकशी करून कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. आता या पोलीस कर्मचाऱ्यांची विभागीय चौकशी होणार आहे आणि त्यानंतर पुढील कारवाईचे आदेश सह पोलीस आयुक्तांनी दिले आहेत.