ठाणे - भारतीय चलनातील ५०० रुपयांच्या बनावट नोटा घेऊन आलेल्या एकाला गुन्हे शाखा युनिट-५ च्या पोलीस पथकाने पकडले. यातील आरोपीला तीनहात नाका परिसरात ५०० रुपयांच्या २ लाख ८३ हजाराच्या ५६६ नोटांसह अटक केली. तर यातील एकजण फरार झाला आहे. काळुराम बुद्धा इंदवाळे असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
अटक केलेला आरोपी काळुराम बुद्धा इंदवाळे आणि फरारी आरोपी कांती मोकाशे उर्फ कांतीलाल या दोघांनी संगनमत करीत ५०० रुपयांच्या बनावट नोटा येथील तीनहात नाका परिसरात येणार असल्याची माहिती, गुन्हे शाखा युनिट-५ च्या पथकाला खबऱ्याने दिली. त्यानुसार पोलिसांनी वागले आरटीओ कार्यालयाजवळ, हायवे हॉस्पिटलसमोर सापळा रचला. तेव्हा आरोपी इंदवाळे आणि मोकाशे उर्फ कांतीलाल हे ५०० रुपयांच्या बनावट नोटा घेऊन आले. पोलिसांनी संशयित म्हणून पाठीवर काळ्या रंगाची सॅक असलेल्या इंदवाळे याला ताब्यात घेतले. तोच त्याचा साथीदार आरोपी कांती मोकाशे उर्फ कांतीलाल हा फरार होण्यात यशस्वी झाला. पोलीस पथकाने काळ्या सॅकची तपासणी केल्यानंतर त्यात २ लाख ८३ हजाराच्या ५०० च्या विविध सिरियलच्या नोटा सापडल्या. मात्र, या नोटा बनावट असल्याचे समोर आले.
गुन्हे शाखा युनिट-५ द्वारा अटक आरोपीवर वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांच्या हातावर तुऱ्या देऊन पोबारा करणाऱ्या फरारी आरोपीचा शोध पोलीस घेत आहेत. आरोपींनी बनावट नोटा कुठून आणल्या? आतापर्यंत किती बनावट नोटा चलनात चालविल्या? किंवा या बनावट नोटा कुणाला देण्यासाठी आणल्या होत्या? याबाबत वागळे गुन्हे शाखा युनिट-५ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयराज रणवरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथक आणि वागळे इस्टेट पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पठाण करीत आहेत.