ठाणे : आपले एटीएम कार्ड आणि पिन क्रमांक वेटरकडे देण्याची किंमत एका ज्येष्ठ नागरिकाला आपल्या प्राणाने चुकवावी लागली. या वृद्धाने अत्यंत विश्वासाने आपले एटीएम कार्ड आणि पिन पैसे काढण्यासाठी हॉटेलच्या वेटरकडे दिले. मात्र त्याच वेटरने वृद्धाचा खून करून त्याच्याच पैश्याने ऐश केल्याच्या घटनेने ठाणे शहर हादरले आहे. अखेरीस ठाणे पोलिसांनी हजारो किलोमिटर प्रवास करून आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत. काराभाई रामभाई सुवा असे खून करण्यात आलेल्या वृद्धाचे नाव आहे. तर राजन शर्मा असे खुनी वेटरचे नाव असून तो उत्तर प्रदेशातील महाराजगंज जिल्ह्यातील आहे. खून केल्यानंतर मारेकरी वेटर अगोदर रत्नागिरी आणि तेथून गोवामार्गे कर्नाटकातून नेपाळला पळाला होता. मात्र पोलिसांनी मोठ्या शिताफिने त्याच्या मुसक्या आवळल्या आहेत.
एटीएम कार्ड आणि पिन नंबर दिल्याने झाला घात : आपले एटीएम कार्ड आणि त्याचा पिन नंबर कोणालाही देऊ नका असे बँका सतत सांगत असतात परंतु सामान्य नागरिक त्याकडे कानाडोळा करतात आणि त्याचे परिणाम काय होऊ शकतात याचे ज्वलंत उदाहरण ठाण्यात पहायला मिळाले. दिनांक 27 में 2023 रोजी ठाण्यातील रेल्वे स्थानकाजवळील प्रिन्स रेसिडेन्सी या हॉटेलच्या रूम नंबर 303 मध्ये काराभाई रामभाई सुवा या ज्येष्ठ नागरिकाचा खून झाला होता. त्यांचा गळा धारदार शस्त्राने चिरण्यात आल्याने एकच खळबळ उडाली होती. ठाणेनगर पोलिसांनी सदर घटनेची गंभीर दखल घेत तपास सुरु केला. यावेळी सदर हॉटेलमधील एक वेटर घटनेच्या दिवसापासून फरार असल्याचे पोलिसांना समजले.
गोवा मार्गे कर्नाटकातून पळाला नेपाळला : पोलिसांनी या हॉटेलमधील सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक बाबींच्या आधारे तपास केला असता तो रत्नागिरी येथे गेल्याचे निष्पन्न झाले. रत्नागिरी येथे आरोपीने मृत व्यक्तीचे एटीएम कार्ड वापरून त्यातून 80 हजार रुपये काढल्याचे पोलिसांना कळाले. पोलिसांची टीम रत्नागिरीत पोहोचण्याआधीच आरोपी हा गोवा मार्गे कर्नाटक येथे पोहोचला. आपल्या गावी उत्तर प्रदेश येथे गेला असता, पोलिसांनी देखील त्याचा माग काढत उत्तरप्रदेश गाठले. उत्तर प्रदेशातून आरोपी पुढे नेपाळ येथे गेला असता पोलीस त्याची वाट बघत त्याच्या गावातच थांबले. ठाणे पोलिसांनी उत्तर प्रदेश एसटीएफची मदत घेत तब्बल 26 तास या आरोपीची वाट पाहिली. अखेर 6 जून रोजी पोलिसांना मोठे यश मिळाले. मारेकरी आपल्या गावी येताच पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या व त्याला परत ठाणे येथे आणले.
एटीएममधून पैसे काढायला दिल्याने लालसेपोटी हत्या : पोलिसांनी मारेकरी वेटरला पकडून आणल्यानंतर त्याची चौकशी केली. यावेळी त्याने मृत व्यक्तीने आपल्याकडे पैसे काढण्यासाठी स्वतःची एटीएम कार्ड आणि पिन दिल्याचे सांगितले. मृत व्यक्तीच्या अकाउंटमध्ये भरपूर पैसे असल्याचे पाहून आपल्या मनात हाव निर्माण झाली व त्यातूनच आपल्या हातून हा खून झाल्याचे त्याने मान्य केले. स्वतःच्या बँक अकाउंटचे एटीएम कार्ड आणि पिन कोणत्याही अनोळखी व्यक्तीला देऊ नये, अन्यथा अशा प्रकारे आपल्यावर संकट ओढवू शकते असा संदेश पोलीस उपायुक्त गणेश गावडे यांनी यावेळी दिला.
हेही वाचा -