ठाणे - लॉकडाऊन काळात भिवंडीतील एका कंपनीचे टीव्ही, मोबाईल, एलसीडी साठवलेल्या गोदामातुन तब्बल 40 लाख 50 हजार 935 रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला होता. मात्र, ठाणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला गोदाम परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे दोन आरोपींना अटक करण्यात यश आले आहे. यश विजय डोंगरे (रा.अंबाडी ता.भिवंडी) योगेश केशव पाटील (रा.परशुराम पाडा, दाभाड ता. भिवंडी) अशी अटक केलेल्या आरोपींचे नावे आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार भिवंडी तालुका पोलीस ठाणे क्षेत्रातील वडपे येथील जीकॉम लॉजीस्टिक्स प्रा. ली. चे गोदाम असून यामध्ये एल जी कंपनीचे एलसीडी, टीव्ही, मोबाईल साठविले जातात. सध्या पोलीस यंत्रणा कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी व्यस्त आहेत. अशातच, 22 एप्रिल रोजी चोरट्यांनी रात्रीच्या सुमारास गोदामाच्या मागील बाजूचे शटर तोडून गोदामतील महागडे एलसीडी, टीव्ही, मोबाईल असा 40 लाख 50 हजार 935 रुपयांचा मुद्देमाल चोरी कोल्याचे उघड झाले. या प्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या गुन्ह्याचा तपास भिवंडी तालुका पोलीस व स्थानिक गुन्हे शाखा यांची पथके समांतर पातळी वर तपास करीत असताना स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक व्यंकटेश आंधळे यांनी गोदाम परिसरातली सर्व सीसीटीव्हीची पडताळणी करून आपल्या बातमीदारामार्फत माहिती काढण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी यश डोंगरे व योगेश पाटील या संशयितांची नावे समोर आली. त्या आधारे सहाय्यक पोलीस निरीक्षक परशुराम लोंढे यांच्या पथकाने या दोघांच्या मुसक्या आवळून त्यांना ताब्यात घेतले.
सुरुवातीस कबुली न देणाऱ्या आरोपींनी पोलिसांनी पोलिसी खाक्या दाखविल्यानंतर गुन्ह्याची कबुली दिली. परशुराम पाडा येथील योगेश पाटील याने जुन्या घरात लपवून ठेवलेले 3 एलसीडी, 251 मोबाईल व गुन्ह्यात वापरलेली बोलेरो टेम्पो असा 34 लाख 69 हजार 439 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात यश मिळविले आहे. तर दोन्ही आरोपींना न्यायालयात हजर केले असता 30 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी ठोठाविण्यात आली असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक व्यंकटेश आंधळे यांनी दिली आहे.