ठाणे - कोरोना विषाणूने संपूर्ण जगात थैमान घातले आहेत. प्रत्येक देश आपापल्या परीने या रोगाशी लढा देत असून, यात भारताने देखील कडक उपाययोजना केल्या आहेत. गर्दीपासून होणारा संसर्ग टाळण्यासाठी अनेक उपाय योजना करण्यात आल्या आहेत. ठाण्यात तर पोलीस जनजागृती करताना रस्त्यावर उतरलेले पहायला मिळत आहेत.
ठाण्यातील सिडको आणि बाजारपेठ रस्ता नेहमीच गजबजलेला असतो. या गर्दीमुळे कोरोनाचा फैलाव होण्याची शक्यता लक्षात घेता, ठाणे नगर पोलीस स्थानकाचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक रामराव सोमवंशी यांनी नेहमीप्रमाणे सूत्र आपल्या हातात घेतली आहेत. घोषणा करायचा मेगाफोन हातात घेऊन नागरिकांमध्ये जाऊन त्यांनी अत्यंत महत्वाच्या सूचना केल्या. गर्दीची ठिकाणे व अनावश्यक प्रवास टाळण्याचे आवाहन त्यांनी नागरिकांना केले. बाहेर पडावे लागलेच तर मास्क किंवा कपड्याने नाक आणि तोंड झाकून घ्या, असे ते म्हणाले. राज्यात आपत्ती व्यवस्थापन आणि जमावबंदी कायदे लागू असल्याने कोणीही गर्दी न करता आदेशांचे पालन करावे अन्यथा कारवाईस सामोरे जावे लागेल, असा इशारा देखील त्यांनी दिला.