ठाणे- जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. राज्यातही कोरोनाचा विषाणू झपाट्याने पसरत आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्यात लाॅकडाऊन लागू असून संचारबंदीही आहे. नागरिकांनी घरातच बसावे, काळजी घ्यावी, असे प्रशासन वारंवार आवाहन करत आहे. मात्र, काही नागरिक घराबाहेर येत आहेत. ठाण्यातील लोकमान्यनगर येथे आज सकाळी काही हौशी मंडळी मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडली असता ते पोलिसांच्या हाती लागली. पोलिसांनी या सर्वांना शिक्षा म्हणून योगाभ्यास करुन घेतला.
हेही वाचा- COVID-19 : भारताने गाठला चार हजार रुग्णांचा टप्पा; बळींची संख्याही शंभरहून अधिक..
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घराबाहेर पडू नका, परिस्थितीचे गांभीर्य ओळखा असे सांगितले जात आहे. मात्र, तरिही नागरिक घराबाहेर पडत आहेत. कोरोनावर सध्यातरी सोशल डिस्टनसिंग अर्थात एकमेकांमध्ये अंतर ठेवणे हा एकमेव उपाय असल्याने संपूर्ण देश घरात बंद आहे. परंतु, आज सकाळी लोकमान्यनगर येथील काही हौशी मंडळी मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडली. पोलिसांनी त्या सर्वांना पकडून लोकमान्यनगर बस डेपो येथे नेले. तेथे त्यांच्याकडून चक्क योगाभ्यास करुन घेतला. गेले होते चालायला पण योगा करुन परतले अशी त्यांची परिस्थती झाली होती.
दरम्यान, यापुढे आणखीन कडक पाऊले उचलणार असल्याचे सूतोवाच सरकारने केलेला असल्याने अशा बेशिस्त लोकांना घरीच बसण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.