ठाणे - भिवंडी तालुक्यातील मानकोली चिंचोटी रस्त्यावर मालोडी टोल नाका येथे खड्यामुळे बुधवारी अपघात झाला. या अपघातात राजेश ईश्वरभाई पटेल यांचा मृत्यू झाला आहे. पटेल यांच्या मृत्यूला सर्वस्वी टोल वसूल करणारी सुप्रीम कंपनी जबाबदार असल्याचा आरोप येथील स्थानिक नागरिकांनी केला आहे.
या अपघाती मृत्यू प्रकरणी सुप्रीम कंपनीवर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या निर्देशानुसार सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी मानकोली, अंजुरफाटा चिंचोटी गाव विकास समितीचे ज्ञानेश्वर ओम मुकादम यांच्यासह कार्यकर्त्यांनी केली. त्यासंदर्भातील लेखी निवेदन देखील भिवंडी तालुका पोलीस ठाणे व सार्वजनिक बांधकाम विभागाकडे गाव समितीने दिले आहे.
भिवंडीतील मानकोली चिंचोटी महामार्गावर सध्या खड्ड्यांचे साम्राज्य पसरले असून अंजुरफाटा ते खारबावपर्यंत या रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे. या खड्डेमय रस्त्यांवरून वाहन चालवितांना वाहन चालकांना अनेक अडचणी येत आहेत. रस्त्याच्या दुरवस्थेमुळे स्थानिक नागरिकांनी अनेक वेळा आंदोलने केली आहेत. मात्र, या रस्त्याचा ठेका घेणाऱ्या व टोल वसुली करणाऱ्या सुप्रीम कंपनीने आजतागायत स्थानिक नागरिकांच्या आंदोलनाकडे दुर्लक्ष केले असून या रस्त्याची आजही दुरवस्था झाली आहे.
विशेष म्हणजे या खड्डेमय रस्त्यावर अपघात होऊन प्रवाशांचे जीव गेले तर त्याची सर्वस्वी जबाबदारी सुप्रीम कंपनीवर असणार असल्याचे लेखी पत्र देखील सार्वजनिक बांधकाम विभागाने सुप्रीम कंपनीस दिले आहे. मात्र, सुप्रीम कंपनीने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कोणत्याही पत्राची दाखल घेतली नाही. कंपनीच्या ढिसाळ कारभाराला वैतागून अखेर राज्यशासनाने या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी सात कोटी रुपयांचा अतिरिक्त निधी मंजूर केला असून खासगी ठेकेदाराकडून या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम सुरू झाले आहे. मात्र, या दुरुस्ती कामात देखील मोठा भ्रष्टाचार होण्याची शक्यता स्थानिक नागरिकांकडून वर्तविण्यात येत आहे.