ठाणे- कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात गेल्या काही दिवसात कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. कोरोना रुग्णसंख्येने ३२ हजाराचा आकडा ओलांडला आहे. तर, दररोज ४०० च्या आसपास रुग्णांची नोंद होत आहे. आजही ४०५ रुग्ण पालिका क्षेत्रात आढळून आले आहेत. रोज वाढणाऱ्या रुग्ण संख्येला इमारतींमध्ये राहणारे नागरिक जबाबदार असून ८० टक्के रुग्ण हे इमारतींमध्ये राहणारे असल्याचा अजब दावा पालिकेच्या साथरोग नियंत्रण अधिकारी डॉ. प्रतिभा पानपाटील यांनी केला आहे.
गणेशोत्सवानंतर कल्याण डोंबिवली मधील कोरोना रुग्णांची संख्या वाढली आहे. दररोज ४०० ते ४५० रुग्णसंख्या येत आहे. यात सुमारे ८० टक्के रुग्ण हे इमारतीमध्ये राहणारे आहेत. इमारतीमधले रुग्ण गृहविलगीकरणाच्या नियमांचे पालन करत नसल्याच्या अनेक तक्रारी पालिकेकडे येत आहेत. यावर तोडगा काढण्यसाठी पालिका आयुक्तांनी यासंदर्भात सर्व प्रभाग अधिकारी, आरोग्य विभाग, पोलीस उपायुक्त यांची बैठक बोलवली होती. बैठकीत सर्व कंटेन्मेंट झोनमधील रहिवाशांनी मास्क वापरणे, सोशल डिस्टन्सिंग पाळणे बंधनकारक करण्यात आले असून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई होणार आहे. याबाबतचे पत्र प्रत्येक सोसायटीच्या सचिवांना पाठविणार असल्याची माहिती पालिकेच्या साथरोग नियंत्रण अधिकारी डॉ. प्रतिभा पानपाटील यांनी दिली.
दरम्यान, रुग्णसंख्या वाढीला इमारतींमधील नागरिकांना जबाबदार धरल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. महानगरपालिका कोरोनाला अटकाव करण्यात अपयशी ठरत असल्याने त्याचे खापर नागरिकांवर फोडण्याचा हा अजब प्रकार असल्याच्या प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केल्या आहेत.
कल्याण डोंबिवलीत कोरोना रुग्णांची संख्या ३२ हजार पार; ६९१ जणांचा मृत्यू
कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात कोरोना रुग्णांनी ३२ हजारांचा टप्पा ओलांडला असून आज नव्या ४०५ कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर ७ जणांचा मृत्यू झाला असून गेल्या २४ तासात १५१ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आज आढळून आलेल्या ४०५ रूग्णांमध्ये कल्याण पूर्व ३९, कल्याण प. ११७, डोंबिवली पूर्व १८०, डोंबिवली प- ५५, मांडा टिटवाळा ७, मोहना येथील ७ रुग्णांचा समावेश आहे.
डिस्चार्ज झालेल्या रुग्णांपैकी १०२ रुग्ण हे टाटा आमंत्रमधून, ११ रुग्ण वै.ह.भ.प. सावळाराम महाराज क्रीडा संकूलमधून, ११ रुग्ण बाज आर. आर. रुग्णालय, ७ रुग्ण पाटीदार कोविड केअर सेंटरमधून, ७ रुग्ण डोंबिवली जिमखाना कोविड समर्पित रुग्णालयातून डिस्चार्ज झाले आहेत. तर, उर्वरित रुग्ण हे इतर रुग्णालयामधून, तसेच गृहविलगीकरणातून बरे झालेले आहेत.
हेही वाचा- कंत्राटदारांच्या मनमानी कारभाराला पालिका प्रशासन बळी; परिवहन कर्मचाऱ्यांचे पुन्हा ठिय्या आंदोलन