ठाणे- तीन वर्षापूर्वी मानपाडा जवळ अॅक्मे रेंटल योजना सुरू झाली होती. या योजनेतील इमारतीतील नागरिकांना सुविधेअभावी अनेक प्रश्नांना सामोरे जावे लागत असून याबाबत मनसेच्या वतीने स्थानिकांना सोबत घेऊन इमारतीसमोर मूक आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलनकर्त्यांनी पालिका प्रशासनाचा निषेध केला.
इमारतीच्या जिन्यात कचऱ्याचे ढीग, तळमजल्यावर घाणीचे साम्राज्य, पाणी टंचाई, अशा अनेक समस्यांबाबत मनपाला तक्रार करण्यात आली होती. मात्र, मनपाने त्याची दखल घेतली नाही, अशी गाऱ्हाणी स्थानिकांनी आंदोलनात मांडली. तब्बल २२ मजली उंच असलेल्या रेंटल हौसिंग योजनेच्या या इमारतीमध्ये कळवा, मुंब्रा तसेच ठाणे शहरातील विविध भागातून आणलेल्या विस्थापित कुटुंबांना घर उपलब्ध करून देण्यात आले आहेत. मात्र, या इमारतीच्या सर्व मजल्यांवर घाणीचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे, दुर्गंधीच्या फेऱ्यात राहणाऱ्या रहिवाशांना रोगराईने ग्रासले आहे.
दूषित पाण्यामुळे अनेकांना आजारांची लागण झाली असून ही अवस्था पाहून येथील कुटुंबीय हवालदिल झाले आहेत. येथील बहुतेक सर्व घरात लिकेजची समस्या आहे. त्यामुळे, नागरिकांना पावसात घर सोडून जावे लागते, किंवा सिलिंगला प्लास्टिक लावावे लागते. पिण्याच्या पाण्याचा तीन दिवसांनी पुरवठा होतो. तोही फक्त २० मिनिटे. त्यातच अतिरिक्त ताण आल्याने पाण्याची मोटर जळल्यास पाणी कमी दाबाने पोहोचते. त्यामुळे, इमारतीतील नागरिकांना अनेकदा चार दिवस पाण्यावाचून राहावे लागते.
इमारतीच्या मजल्यांवर कचरा काढायला कोणीही येत नाही. तर, लिफ्टमध्ये बिघाड झाल्यास जिने उतरावे लागतात. मात्र, जिन्यात लाईट नसल्याने अंधारात नागरिकांना ये-जा करावी लागते. याविषयी मनसेने पालिकेला पत्र व्यवहार केला आहे. मात्र, त्यावर पालिका प्रशासनाने दखल घेतली नाही. त्यामुळे, आज मनसेने आंदोलन केले असल्याचे मनसेचे पदाधिकारी स्वप्नील महिंद्रकर यांनी सांगितले.
हेही वाचा- मीरा भाईंदर शहराला मंजूर कोट्याप्रमाणे मिळणार पाणी - उद्योगमंत्री