ठाणे - जिल्ह्यात कोरोनाच्या काळात रुग्णवाहिकेच्या अनेक अडचणी समोर आल्या आहेत. अनेक रुग्णांचे रुग्णवाहिका न मिळाल्याने हाल झाल्याचे पाहायला मिळत आहे. तर काही ठिकाणी गर्भवती महिलांची प्रसूतीही रस्त्यावर झाल्याचे समोर आले. मात्र, राज्य सरकार आणि पालिका प्रशासन कोरोनाच्या काळात या जीवनावश्यक सुविधेकडे दुर्लक्ष करत आहे. त्यामुळे ही समस्या आजही कायम आहे.
ठाणे जिल्ह्यात रुग्णवाहिका या पालिका, नगरपालिका आणि नगरपरिषद यांच्या मालकीच्या आहेत. पण कोरोनाच्या सुरूवातीच्या काळात वाढत्या रुग्णांमुळे रुग्णवाहिकांची संख्या फारच अपुरी होती. त्यामुळे शासनाने अध्यादेश काढत खासगी रुग्णवाहिका अधिग्रहित करण्याचे आदेश दिले, पण काही मुजोर रुग्णवाहिका मालकांनी आपल्या रुग्णवाहिका प्रशासनाला न देता वाढीव भाडे आकारून सेवा दिली. कारण रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांमध्ये भीतीचे वातावरण होते, त्याचा त्यांनी फायदा घेतला. ही बाब सरकारच्या लक्षात आल्यावर त्यांनी यावर तोडगा काढला. आता कोरोनाचे रुग्ण वाढले असले तरी त्यांना रुग्णवाहिका पुरेशा असल्याचे प्रशासन सांगत आहे.
ठाण्यात परिस्थिती
ठाणे महानगरपालिका क्षेत्रात जिल्ह्यात सर्वात जास्त रुग्ण मिळत आहेत. त्यामुळे पालिका प्रशासनाने 30 रुग्णवाहिका भाडेतत्वावर घेतल्या आहेत. त्यांना परिवहन विभागाने दिलेल्या नियमानुसार पेमेंट केले जाते. पालिकेच्या स्वतःच्या मालकीच्या 30 रुग्णवाहिका आहेत. 20 परिवहनच्या बसेस पालिकेने रुग्णवाहिकेत रूपांतर केलेल्या आहेत. त्यामुळे ठाण्यात आता रुग्णवाहिकेची अडचण राहिली नाही. ठाण्यात कोरोनाशी लढण्यासाठी वॉर रूम बनवली आहे. त्याच्या माध्यमातून अर्ध्या तासात रुग्णवाहिका रुग्णापर्यंत पोहोचते. ठाण्यात आता रुग्णवाहिकेची संख्या 80 पर्यंत गेली आहे. त्यामुळे ठाण्यात आता ही अडचण नाही.
कल्याण डोंबिवली महापालिका आरोग्य विभागात केवळ 5 रुग्णवाहिका
महापालिका क्षेत्रात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 19 हजारांच्यावर गेली आहे. मात्र, बोटावर मोजता येतील एवढ्याच रुग्णवाहिका महापालिका प्रशासनाकडे असल्याने सुमारे 75 रुग्णवाहिका भाडेतत्त्वावर घेतल्या आहेत. त्यामध्ये काळी पिवळी टॅक्सीचाही समावेश आहे. महापालिका त्यांना दिवसाला 2 हजार 310 रुपये भाडे अदा करीत आहे.
मिरा भाईंदरमध्ये रुग्णवाहिकेची कमतरता
मिरा भाईंदर महापालिका हद्दीत दररोज शंभरहून अधिक कोरोना रुग्ण आणि त्याहून अधिक कोरोना संशयित सापडत आहेत. रुग्णांसह या संशयितांना रुग्णालय, विलगीकरण केंद्रात नेण्यासाठी पुरेशा प्रमाणात रुग्णवाहिका उपलब्ध नसल्यामुळे रुग्णांचे हाल होत आहेत.
नवी मुंबई पालिकेच्या परिवहन उपक्रमातील (एनएमएमटी) ८ बसेसचे रुग्णवाहिकांत रूपांतर करण्यात आले आहे. आणखी १० बसेसचे रूपांतर करण्यात येत आहे. याशिवाय आमदारांच्या स्थानिक विकास निधीतून ३ रुग्णवाहिका घेण्याचा प्रस्ताव ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठवण्यात आला आहे. बेलापूर मतदारसंघाच्या आमदार मंदा म्हात्रे यांच्या आमदारनिधीतून ३ रुग्णवाहिका पालिकेच्या ताफ्यात दाखल झाल्या असून, ५० खासगी रुग्णवाहिका शहरात असून, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अधिक दर आकारला जात असल्याचे निदर्शनास येत आहे.
परिवहन विभागाने केले दर निश्चित
परिवहन विभागाने मुंबई महानगरक्षेत्रात रुग्णवाहिकेचे दर निश्चित केले आहेत. रुग्णवाहिकेच्या विविध प्रकारानुसार हे दर ठरवण्यात आले असून हे दर मुंबई, नवी मुंबई, ठाणे, वसई-विरार, अलिबाग आदी मुंबई महानगर क्षेत्रात येणाऱ्या परिसरासाठी आहेत. नवीन दराचे पत्रक रुग्णवाहिकेत लावण्यात यावेत अशा सूचना देण्यात आल्या आहेत. रुग्णवाहिकेत बसल्यापासून रुग्णालयात जाण्याच्या आणि येण्याच्या अंतरासाठी हे दर नक्की करण्यात आले आहेत.
२५ किलोमीटरच्या पुढे गेल्यास प्रति किलोमीटर भाडे हे मूळ भाडय़ात वाढवून एकूण भाडे आकारण्याचा नियम करण्यात आला आहे. पहिल्या एक तासाच्या प्रतिक्षा कालावधीसाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. त्यानंतरच्या प्रत्येक तासाला ५० रुपये प्रती तास असे भाडे आकारले जाणार आहे.