ठाणे - मध्य रेल्वेच्या उल्हासनगर रेल्वे स्थानकावर टीसीने रेल्वे तिकिटासाठी विचारले असता प्रवाशाने वाद घालून टीसीच्या गुप्तांगावर जोरदार लाथाबुक्याने प्रहार केला. यात टीसी जखमी झाला. महेश कुमार असे टीसीचे नाव आहे. त्यांच्यावर कल्याणच्या रेल्वे रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहे. कल्याण लोहमार्ग पोलिसांनी हल्लेखोराला ताब्यात घेऊन अटक केली आहे. आलम शेख असे त्याचे नाव आहे.
हेही वाचा- शिवसेनेसोबत चर्चेसाठी काँग्रेस-राष्ट्रवादीची प्रत्येकी पाच नेत्यांची समिती गठीत
मिळालेल्या माहितीनुसार उल्हासनगर रेल्वे स्थानकातील महेश कुमार हे मंगळवारी सायंकाळच्या सुमारास क्रमांक २ फलाटावर प्रवाशांचे तिकीट तपासणीसाठी उभे होते. त्याच सुमाराला आरोपी आलम कडेही त्यांनी तिकीट तपासणी करण्यासाठी मागणी केली. मात्र, त्याच्याकडे तिकीट नसल्याने त्याला महेश कुमार यांनी नियमानुसार २६० रुपये दंड भरण्यासाठी सांगितले. मात्र, त्याने दंड भरण्यास नकार दिला. महेश कुमार यांनी आरपीएफ पथकाकडे कारवाईसाठी ताब्यात देण्याची प्रक्रिया सुरू केली. यावेळी आरोपीने शिवीगाळ करीत महेश कुमार यांना लाथाबुक्याने मारहाण केली. या मारहाणीत महेश कुमार जमिनीवर कोसळल्याने आरोपीने त्यांच्या गुप्तांगावर लाथाबुक्याने जोरदार प्रहार केला. घटनास्थळापासून काही अंतरावर असलेल्या लोहमार्ग पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेऊन कल्याण लोहमार्ग पोलिसांच्या स्वाधीन केले.
दरम्यान, रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी प्रत्येक टीसीला वसुलीच्या ठराविक रक्कम जमा करण्यासाठी दबाव टाकला जात असल्याचे सांगण्यात आले. कधी-कधी तर वसुली पूर्ण करण्यासाठी टीसीवर अनेकवेळा हल्ले झाले. मात्र, आजही त्यांची सुरक्षा वाऱ्यावर असल्याचे या घटनेवरून समोर आले आहे. तर तिकट चेकिंग स्टाफ वेलफेयर ट्रस्ट, मुंबईचे अध्यक्ष अनिल कुमार गर्ग आणि सचिव डी.वी.चिंदरकर यांनी मुकेश कुमार यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा निषेध व्यक्त करीत टीसींना सुरक्षा देण्याची मागणी केली आहे.