पनवेल- मावळ लोकसभा मतदारसंघाचे आघाडीचे उमेदवार पार्थ पवार यांना पनवेलमधील सभेला जाताना वाहतूक कोंडीचा फटका बसला. त्यामुळे सभेला जाण्यासाठी उशीर होऊ नये, म्हणून आजूबाजूला असलेला पोलिसांचा फौजफाटा आणि आलिशान गाडी सोडली. त्यानंतर पार्थ पवार यांनी चक्क रस्त्यावरुन धावत-पळत सभा गाठली.
मावळ मतदार संघात शिवसेनेचे श्रीरंग बरणेंना जोरदार टक्कर देताना आघाडीचे उमेदवार पार्थ पवार यांना बरीच कसरत करावी लागत आहे. याचाच प्रत्यय नुकताच पनवेलमध्ये आला. सध्या पनवेलकरांचे प्रश्न समजून घेण्यासाठी पार्थ पवार हे पनवेलच्या दौऱ्यावर आहेत. काल पनवेलमधील दौरा आटोपून त्यांनी पनवेल ते सीएसटी असा लोकलचा प्रवास केला. त्यांनतर रात्री पनवेलमधील मोहल्ला परिसरात पार्थ पवार प्रचारासाठी येणार होते. यावेळी ते मुस्लीम मोहल्ल्यातील नागरिकांची भेट घेणार होते. त्यांनतर मस्जिदमध्ये देखील जाणार होते. मोहल्ला परिसरात सभेला उशीर होत असल्यामुळे चक्क पार्थ पवार यांनी रस्त्यावरुन धावत पळत सभा गाठण्याचा पर्याय स्वीकारला.
पार्थ पवार रस्त्यावरुन धावतानाचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. पार्थ पवार यांनी बुधवारी केलेला लोकल प्रवास आणि नंतर रस्त्यावरुन धावत सभा गाठण्याचा प्रयत्न पाहता प्रचारासाठी ते वडील अजित पवार यांच्या पावलावर पाऊल ठेवताना दिसून येत आहेत.