नवी मुंबई - दिवसागणिक कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. वाढत्या कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी शाळा गेल्या सहा महिन्यांपासून बंद आहेत. त्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून विद्यार्थ्यांचे ऑनलाइन वर्ग घेतले जात आहेत. शाळा सुरू झाल्याशिवाय शाळा व्यवस्थापनाने कोणत्याही प्रकारच्या शुल्काची मागणी करू नये, अशा स्पष्टपणे सूचना देऊनही खारघरमधील इम्पेरिअन शाळेने फी न भरल्याने काही विद्यार्थ्यांचे ऑनलाइन शिक्षण बंद करण्याचा प्रताप केला आहे. यामुळे पालकांनी शाळेबाहेर जमा होऊन शाळा प्रशासनाविरोधात घोषणा देत निषेध व्यक्त केला.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या टाळेबंदीमुळे याचा फटका कित्येक नागरिकांना बसला आहे. सद्यस्थितीत रोजगार गेल्यामुळे व व्यवसायात मंदी आल्यामुळे कित्येक पालकांना आर्थिक संकटाना सामोरे जावे लागत आहे. शाळा सुरू झाल्याशिवाय कोणत्याही प्रकारचे शुल्क भरण्याची सक्ती करू नये, असे शिक्षण मंत्र्यांचे आदेश असूनही खारघर मधील इम्पेरिअन शाळेने फी न भरल्याने काही विद्यार्थ्यांना शाळेकडून घेण्यात येणाऱ्या ऑनलाइन वर्गात बसण्यास मज्जाव केला व ग्रुपमधून काढून टाकले. या प्रकरणी पालकांनी शाळा व्यवस्थापनाकडे दाद मागितली. मात्र, त्याकडे शाळा प्रशासनाने दुर्लक्ष केले. त्यामुळे शाळा प्रशासनाच्या निषेधार्थ पालकांनी शाळेबाहेर जमून शाळेविरोधात घोषणा दिल्या.हेही वाचा - वर्तक नगर पोलीस वसाहतीचा पुन:र्विकास तीन वर्षांतच करणार - जितेंद्र आव्हाड