नवी मुंबई : पीडित तीन वर्षीय मुलीची आई तिच्या मुलांसह पनवेल रेल्वे स्थानकावरील फलाट क्रमांक 1 च्या बाकड्यावर झोपली होती. रात्री साडेतीनच्या सुमारास पीडित मुलीची आई लघुशंका करण्यासाठी उठली असता, तिला तिच्याजवळ झोपलेली तिची तीन वर्षीय लहान मुलगी गायब असल्याने आढळून आले. मुलगी जवळ नसल्याचे पाहून मुलीच्या आईने हंबरडा फोडला. मुलीचा आजूबाजूला शोधही घेतला. परंतु मुलगी आजूबाजूला सापडली नाही. मुलीच्या आईचे रडणे ऐकून आजूबाजूला झोपलेली लोकही जागी झाली. तिला रडण्याचे कारण विचारले, तेव्हा जवळ झोपलेली लहान मुलगी नाहीशी झाल्याचे सांगितल्यावर तिला थेट पोलीस स्टेशन गाठण्याचा सल्ला जवळ असणाऱ्या लोकांनी दिला.
झुडपाच्या दलदलीत पीडित मुलगी आढळली : पोटची जवळ झोपलेली मुलगी गायब झाल्याचे लक्षात येताच, मुलीच्या आईने थेट पोलीस स्टेशन गाठले. आपली तीन वर्षीय मुलगी गायब झाल्याचे पोलिसांना कळवले. या प्रकरणाची गंभीरता लक्षात घेताच पोलिसांनी तात्काळ मुलीचा शोध घेण्यास सुरुवात केली. खूप शोधाशोध केल्यानंतर संबंधित मुलगी पनवेल रेल्वे स्थानकाबाहेरील फलाट क्रमांक एकच्या बाजूला पश्चिम दिशेस असणाऱ्या सिमेंट स्लीपरच्या बाजूला असणाऱ्या दलदलीत विवस्त्र अवस्थेत बेशुद्ध असल्याचे आढळून आली. पीडित मुलीच्या आईला ही संबंधित मुलगी दाखवली असता तिने लगेच आपली मुलगी ओळखली, त्यानंतर संबंधित मुलीला वैद्यकीय उपचारांकरिता पनवेल येथील उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. तेथे प्राथमिक उपचार करून संबंधित मुलीला मुंबई येथील जे जे रुग्णालयात उपचारांकरिता दाखल केले आहे. पीडित मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल केला.
आरोपीला जुईनगरमधून केले अटक : पीडित तीन वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाल्याचा गुन्हा दाखल होताच, पनवेल रेल्वे पोलिसांनी तपासाची सूत्रे हाती घेतली. गुप्त बातमीदार यांनी पीडित मुलीवर बलात्कार करणारा व्यक्ती हा बाटल्या वेचणारा आहे, अशी माहिती पोलिसांना दिली. आरोपीविषयी माहिती मिळाल्यानंतर पनवेल रेल्वे पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण पथकातील अधिकारी अंमलदार गुन्हे शाखा लोहमार्ग मुंबई येथील पोलीस अधिकारी अंमलदार, तसेच रेल्वे सुरक्षा बलाचे अधिकारी जवान यांना घडलेल्या गंभीर गुन्ह्याची माहिती देऊन त्यांचे टीम तयार करण्यात आली. त्यांना आरोपीचा शोध घेण्याबाबत मार्गदर्शन करून रवाना करण्यात आले.
आरोपीची तपासणी : या गुन्हाच्या तपासादरम्यान रेल्वे सुरक्षा बल जवान आनंदकुमार हे जुईनगर रेल्वे स्टेशन येथे फलाटावर गस्त घालीत होते. तेव्हा आरोपी मुकेश बाबू खा साह (वय 30) हा कळंबोली हायवे येथील ब्रिज खाली राहणारा व बाटली गोळा करणारा फिरस्ता संशयितरित्या फिरत होता. त्यामुळे पोलिसांना त्याच्या बाबतीत अधिकच संशय आला. त्याला ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात हजर केले असता त्याची विचारपूस करून विश्वासात घेतले. संबंधित व्यक्तीने गुन्हा केल्याचे कबूल केले. त्यानंतर आरोपीची तपासणी करून तांत्रिक विश्लेषण अंतर्गत हा गुन्हा संबंधित आरोपीने केल्याचे निष्पन्न झाले आहे. पोलिसांनी तात्काळ त्याला अटक केले आहे.
आरोपीने साधली संधी : रात्री पनवेल रेल्वे स्थानकाजवळ फलाटावर महिला मुलांसह फलाटावर झोपली होती, हे पाहताच मुकेश कुमार यांनी संबंधित मुलांची आई ही गाढ झोपल्याची खात्री करत, झोपलेल्या तीन वर्षीय मुलीला उचलले. तिला स्टेशनच्या जवळच असणाऱ्या सिमेंट स्लीपरच्या बाजूला असणाऱ्या दलदलीत नेले. तिच्यावर बलात्कार केला, त्यानंतर मुलीला तिथेच टाकून आरोपीने पलायन केले. या गुन्ह्याचा पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रवीण पाडवी हे करीत आहेत.