ठाणे : भारत सरकारने यंदाच्या वर्षी देशातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगीरी करणाऱ्या ९१ जणांना 'पद्मश्री' पुरस्काराने सन्मानित केले. यामध्ये महाराष्ट्रातील सन्मानीय भिकू रामजी इदाते, राकेश झुनझुनवाला (मरणोत्तर), प्रभाकर मांडे, डॉ. परशुराम खुणे, गजानन माने, रमेश पतंगे, रविना टंडन, कुमी वाडिया हे पद्मश्री पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत. यामध्ये डोंबिवलीत राहणारे गजानन काका नावाने प्रसिद्ध असलेले गजानन काका समाजसेवासह सामाजिक क्षेत्रात ३२ वर्ष कार्यरत असून त्यांनी भारतीय नौदल सेनेमध्ये १२ वर्ष सेवा केलेली आहे.
भारत पाकिस्तान युध्दात सहभाग : विशेष म्हणजे त्यांनी नैदलात असतानाच भारत पाकिस्तान सन १९७१ च्या युध्दात देखील सहभाग घेतला होता. त्यानंतर नौदलातून निवृत्त झाल्यानंतर त्यांनी समाजसेवेचा वसा अंगीकारला. गेल्या ३२ वर्षापासून कृष्ठरोग निर्मुलन कार्यात त्यांनी उल्लेखनिय काम केलेले आहे. कुष्ठरोग्यांसाठी शिक्षण, आरोग्यसह मूलभूत गरजा आणि त्यांना उत्पन्नाचे साधन देखील गजानन काका यांनी कल्याण डोंबिवली महापालिकेमार्फत मिळवून दिले आहे.
कुष्ठरोगासाठी पहिले रुग्णालय : विशेष म्हणजे गजानन माने यांच्या मार्गदर्शन आणि प्रयत्नांमुळे कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात कुष्ठरोगासाठी राज्यातील पहिले रुग्णालय कल्याण पूर्वेतील पत्रीपुला नजीक असलेल्या हनुमाननगरमधील कुष्ठरोगाच्या वसाहतीत उभारण्यात आले. हेच उल्लेखनीय कार्य करताना महाराष्ट्र शासन आणि कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने देखील उल्लेखनिय सहकार्य वारंवार केल्याचे त्यांनी सांगितले. आपण १९९१ साली महापालिकेत नागरिकांच्या समस्या घेऊन गेलो होतो. त्यावेळी तत्कालीन आयुक्त मदान यांनीच मला या कार्यसाठी मोलाचे योगदान दिल्याचे देखील गजानन काका यांनी आवर्जून सांगितले.
कार्याची पोचपावती : काही वर्षांपूर्वीपासून गजानन काका यांनी भारतीय सैन्य दलात तरुणांनी सहभागी व्हावे, यासाठी त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी मार्गदर्शन तसेच अनेक विविध उपक्रम सुरू केले आहेत. महापालिका आयुक्त भाऊसाहेब दांगडे यांनी महापालिकेच्यावतीने गजानन माने यांचा सत्कार केला. दुसरीकडे कार्याची पोचपावती म्हणून भारत सरकराने त्यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर केल्यानंतर माने यांच्या कुटुंबीयांनी देखील आनंद व्यक्त केला जात आहे.
तरुणांन सैन्यात सहभागी व्हावे : २०१८ पासून त्यांचे लक्ष तरुण मुला- मुलींना सैन्य दलात भरती होण्यासाठी प्रेरणा देणे हे आहे. त्याकरिता त्यांनी विविध शाळांमधून मार्गदर्शन शिबीरे करत कोणत्याही प्रकारचे मानधन न घेता सेवा अखंडपणे त्यांनी चालू ठेवली आहे. त्याचप्रमाणे महापालिकेच्या माध्यमातून मुलांना स्फूर्ती मिळावी याकरिता काही मॉडेल्स आणि काही युध्द स्मारके महापालिकेच्या माध्यमातून देखील साकारण्याचा प्रयत्न करीत असल्याचे सांगण्यात आले आहे.