कल्याण डोंबिवली (ठाणे) - कोरोनाबाधित रुग्णांना रुग्णालयात खाट मिळत नसल्याचे सांगत रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावरील कठड्यावर व रुग्णालयाच्या आवारातच बसवून रुग्णांना ऑक्सिजन लावले जात असल्याचे धक्कादायक वास्तव कल्याण-डोंबिवली महापालीकेच्या शास्त्रीनगर रुग्णलयात समोर आले आहे.
खळबळजनक बाब म्हणजे शनिवारीच (दि. 4 जुलै) याच शास्त्रीनगर रुग्णलयाच्या आवारात कोरोना स्वॅब टेस्टिंगसाठी रुग्णांनी भर पावसात रांग लावत गर्दी केल्याचा व्हिडीओ समोर आला होता. रविवारी (दि. 5 जुलै) तर धक्कादायक व तितकेच भयाण वास्तव समोर आल्याने पालिकेच्या नियोजनहीन कारभाराविरोधात संताप नागरिकांमधून व्यक्त करण्यात येत आहे.
हेही वाचा - धक्कादायक..! कोरोना 'स्वॅब टेस्टिंग'साठी भर पावसात रांग; सोशल डिस्टन्सिंगचे तीनतेरा
कल्याण डोंबिवली महापालिकेकडून आरोग्य सुविधेसह वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर खाटांची सुविधा करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा दावा करण्यात आला आहे. मात्र, सद्य स्थितीत कोरोनावर उपचार घेणाऱ्या रुग्णाची संख्या आठ हजारांच्या पुढे गेली आहे. तर उपचार घेणारी संख्या पाच हजारांच्या पुढे आहे. केडीएमसीच्या डोंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णालय असून या रुग्णालयात 57 खाटांचे कोविड सेंटर आहे. मात्र, तेही रुग्णांनी हाऊसफुल्ल झाले आहे. असे असताना श्वास घेण्यास त्रास होत असलेल्या करोनाबाधित रुग्णांना काही वेळच्या फरकाने रुग्णालयात दाखल होताच, या रुग्णाचा जीव वाचविण्यासाठी रुग्णालयाच्या काना कोपऱ्यात जिथे जागा मिळेल तिथे रुग्णांना बसवून त्यांना ऑक्सिजन लावले जात आहे.
पालिकेच्या कोरोनाबाधित कर्मचाऱ्यांनी देखील खाटा मिळत नसून या कर्मचाऱ्यांना देखील शास्त्रीनगर रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावरील आणि आवारातील कठड्यावर बसवून ऑक्सिजन लावण्यात येत असल्याचे समोर आले आहे. यामुळेच रुग्णाचा उपचारा विना जीव जाण्याआधीच रुग्णालयीन व्यवस्था सुधारण्याची मागणी त्रस्त रुग्णाकडून केली जात आहे.