ठाणे - दिवाळीच्या सुट्टीत लहानगे पतंग उडवत आहेत. मात्र, पतंग उडविण्याचा हाच आनंद पक्ष्यांच्या जीवावर अनेकदा बेतल्याचे समोर आले आहे. अशाच एका प्रसंगात घुबडाच्या पंखात मांजा अडकून ते जखमी झाल्याची घटना घडली आहे. ही घटना कल्याण पश्चिमेला असलेल्या पारनाक्यावरील जलकुंभानजीक घडली. पक्षीप्रेमींनी नायलॉन मांजावर बंदी घालण्याची मागणी केली आहे.
हेही वाचा - जालन्यातून आठ मोटार सायकलींसह चोराला ताब्यात घेण्यात पोलिसांना यश
जुने कल्याण म्हणून पारनाका परिसर प्रसिद्ध असून याठिकाणी मोठ्या प्रमाणात जागोजागी जुन्या वाड्यात आजही झाडे आहेत. त्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात घुबडांसह विविध पक्ष्यांची नेहमीच किलबिल असते. अश्यातच गुरुवारी दुपारच्या सुमारास पारनाका येथील जलकुंभानजीक असलेल्या एका झाडावरील पंतगाचा नायलॉनचा मांजा घुबडाच्या पंखात अडकल्याने त्याला वेदना होऊन उडता येत नव्हते. हा प्रकार पाण्याच्या टाकीवरील कामगारांच्या लक्षात आल्याने त्यांनी जखमी घुबडाला मदत करण्याचा प्रयत्न केला. मात्र, घुबडाला वेदना होत असल्याने चोचीने तो मारण्याचा प्रयत्न करीत होता. त्यामुळे वार संस्थेचे पक्षीमित्र हितेश कारंजवाडकर यांच्याशी संपर्क करून त्यांना या प्रकाराची माहिती दिली.
ही माहिती मिळताच हितेश हे घटनास्थळी पोहचले. त्यांनी घुबडाच्या पंखात अडकलेला नायलॉनचा मांजा काढून त्यावर प्राथमिक उपचार करून त्याला पुन्हा हवेत सोडले. याच दरम्यान कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात मांजाच्या विक्रीस बंदी आणावी आणि ज्या दुकानांत नायलॉनचा मांजा विकला जातो. अशा सर्व दुकानांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी पक्षीप्रेमींकडून केली आहे. नायलॉनचा मांजा तुटत नसल्यामुळे उडणारे पक्षी त्यात अडकून पडतात आणि वेळेत त्यांची सुटका न केल्यास ते तडफडतात. त्यामुळे सुती मांजाचा वापर पतंगप्रेमींनी करावा, असेही आव्हान पक्षीप्रेमींनी या पार्श्वभूमीवर बोलताना केले.
हेही वाचा - घरकाम करणाऱ्या महिलेला प्राप्तिकर विभागाची 10 कोटींची नोटीस