ठाणे - ठाणे जिल्हा राजकीय दृष्ट्या महत्त्वाचा आहे. ठाणे जिल्ह्यात विधानसभेचे 18 मतदारसंघ आहेत. ठाणे शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो. मात्र 2014 च्या निवडणुकीत शिवसेनेला 6 जागाच मिळाल्या होत्या. भाजपने 7 जागांवर यश मिळवलं होतं. तर, राष्ट्रवादी 4 आणि अपक्षाने एका जागेवर विजय मिळवला.
येत्या 2019 च्या निवडणुकीत कोण किती जागांवर बाजी मारणार हे पाहणे औत्सुक्याचे आहे. ठाणे जिल्ह्यातील १८ विधानसभा मतदारसंघांमध्ये झालेल्या एकूण मतदानाची अंतिम आकडेवारी समोर आली असून जिल्ह्यात ४७.९१ टक्के मतदान झाल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे मतदानाच्या अंदाजे आकडेवारीपेक्षाही हे मतदान कमी झाल्याचे स्पष्ट झाले आहे. सुशिक्षितांचे शहर अशी ओळख असलेल्या डोंबिवली शहरामध्ये सर्वात कमी मतदानाची नोंद झाली असून इथे ४०.७२ टक्के मतदान झाल्याचे समोर आले आहे. सर्वाधिक मतदान शहापूरमध्ये झाले असून तिथे ६४ टक्क्यांची नोंद झाली आहे. यंदा मतदार याद्यांमधील कोणत्याही मतदारांची नावे हटवण्यात आली नसल्याने मतदाराचा मृत्यू, स्थलांतर आणि क्षेत्र बदल झाल्यानंतरही त्यांची नावे मतदारयादीमध्ये असण्याची शक्यता आहे. त्यामुळेच मतदान कमी झाल्याची शक्यता जिल्हा प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आली आहे.
ठाणे जिल्ह्यातील २०१४ ची परिस्थिती -
भिवंडी ग्रामीण - शांताराम मोरे (शिवसेना), शहापूर - पांडूरंग बरोरा (राष्ट्रवादी), भिवंडी पश्चिम - महेश प्रभाकर चौगुले (भाजप), भिवंडी पूर्व - रुपेश म्हात्रे (शिवसेना), कल्याण ग्रामीण - सुभाष भोईर (शिवसेना), मुरबाड - किसन कथोरे (भाजप), अंबरनाथ - बालाजी किणीकर (शिवसेना), उल्हासनगर - ज्योती कलानी (राष्ट्रवादी), कल्याण पूर्व - गणपत गायकवाड (अपक्ष), डोंबिवली - रवींद्र चव्हाण (भाजप), कल्याण पश्चिम - नरेंद्र बाबूराव पवार (भाजप), मीरा-भाईंदर - नरेंद्र मेहता (भाजप), ओवळा-माजीवडा - प्रताप सरनाईक (शिवसेना), कोपरी-पाचपाखाडी - एकनाथ शिंदे (शिवसेना), ठाणे शहर - संजय केळकर (भाजप), मुंब्रा-कळवा - जितेंद्र आव्हाड (राष्ट्रवादी), ऐरोली - संदीप नाईक (राष्ट्रवादी) बेलापूर - मंदा म्हात्रे (भाजप)