नवी मुंबई - गेल्या काही दिवसांपासून कांद्याचे दर वाढून घाऊक बाजारातच 50 ते 55 रुपये किलोने कांद्याची विक्री झाली होती. मात्र, सद्यस्थितीत कांद्याचा चांगलाच तुटवडा भासत असून नवी मुंबईतील मुंबई कृषी उपत्न बाजार समितीमध्ये येणाऱ्या कांद्याची आवक घटली आहे. त्यामुळे घाऊक बाजारातही कांद्याने नव्वदी गाठली आहे. जुना छोटा कांदा प्रतिकिलो 40 रुपये किलोने विकला जात आहे.
हेही वाचा - मानवी साखळीनंतर मनसेचे टोलमुक्तीसाठी धरणे आंदोलन
यंदाच्या ओल्या दुष्काळाचा मोठा फटका कांदा उत्पादक शेतकऱ्यांना बसला आहे. याचाच परिणाम म्हणून आज मंगळवारी कांद्याला घाऊक बाजारात उच्चांकी दर मिळाला. नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील कांदा-बटाटा विभागात कांद्याला 100 ते 120 रुपये प्रति किलो दर मिळाला. मार्केटयार्डात आज फक्त 90 ट्रक कांद्याची आवक झाली. यामध्ये जुन्या कांद्याचे 15 ट्रक तर नवीन कांद्याचे 75 ट्रक इतकी आवक झाली. चांगल्या प्रतिच्या नवीन कांदा बाजारपेठेत दाखल होण्यासाठी आणखी 1 महिन्याचा कालावधी लागणार आहे. तोपर्यंत कांद्याचे दर चढेच राहण्याची शक्यता आहे.
हेही वाचा - कतारमधील नेमबाज स्पर्धेत ठाण्यातील रुद्रांश पाटीलचा सुवर्ण वेध; ऑलिंम्पिकमध्येही पदक जिंकण्याचा विश्वास
जुन्या कांद्याचा साठा मागणीच्या तुलनेत कमी असल्याची माहिती कांद्याचे व्यापारी नितीन पारेख यांनी दिली आहे. तर घाऊक बाजारात कांदा 100 ते 120 रुपये प्रतिकिलोने विकला जात आहे. मात्र, किरकोळ बाजारात 150 ते 170 रुपये प्रतिकिलोने कांदा विक्री केली जात आहे. अनेक ठिकाणी किरकोळ विक्रेते वाढीव दराने विक्री करत असल्याचेही ग्राहकांनी सांगितले.
चांगल्या दर्जांच्या कांद्याचा तुटवडा -
बाजारात चांगल्या दर्जाच्या कांद्याचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यातच दक्षिणेकडील राज्यांमध्ये चांगल्या प्रतिचा कांदा उपलब्ध नाही. त्यामुळे तेथून मागणी वाढली आहे. परिणामी कांद्याच्या भावात वाढ होत आहे. पावसामुळे नवीन कांद्याचे नुकसान झाले आहे. त्यामुळे भाववाढ झाली आहे.
जुना व छोटा कांदा 40 ते 45 प्रतिकिलो-
जुना व छोटा कांदा 40 ते 45 रुपये प्रतिकिलोने विकला जात आहे. ग्राहक स्वस्त व छोटा कांदा मोठ्या प्रमाणात नेत असल्याची माहिती कांदा व्यापारी दिगंबर आव्हाळे यांनी दिली.