ठाणे - मुरबाड - माळशेज राष्ट्रीय महामार्गावर कार आणि दुचाकीमध्ये जोरदार धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात दुचाकीवरील एक विद्यार्थी ठार झाला असून, चार जण गंभीर जखमी झाले आहेत. याप्रकरणी मुरबाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून पोलिसांनी तपास सुरु केला आहे. ऋषिकेश धुमाळ असे मृत्यू झालेल्या विद्यार्थ्याचे नाव असून, तो 16 वर्षाचा होता.
कारच्या समोरील भागाचा चेंदामेंदा
कल्याण मुरबाड राष्ट्रीय महामार्गावर मडकेपाडा येथे आज दुपारच्या सुमाराला एक भरधाव कार कल्याणहून माळशेजकडे जात होती. त्याच सुमाराला एका दुचाकीवरून आयटीआयमध्ये शिक्षण घेत असलेले ३ विद्यार्थी दुचाकीवरून जात होते. अचानक भरधाव कार व दुचाकीमध्ये हॉटेल राजयोग समोरच मार्गावर जोरदार धडक झाली. हा अपघात एवढा भीषण होता की, दुचाकी उडून लगतच्या शेतात जाऊन पडली, तर कारच्या समोरच्या भागाचा चेंदामेंदा झाला होता. या अपघातात पाच विद्यार्थी गंभीर जखमी झाले. त्यावेळी स्थानिकांच्या मदतीने जखमी.विद्यार्थ्यांना मुरबाडमधील रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचार करण्यापूर्वीच एक जणांचा मृत्यू झाला, तर 4 जखमींवर सध्या उपचार सुरु आहेत. हे तिघेही मुरबाड तालुक्यातील कलमखांडे, कोरावळे, कोंडेसाखरे येथील रहिवासी आहेत. मात्र, त्यांचे नावे समजू शकले नाही.
कल्याण - मुरबाड राष्ट्रीय महामार्ग झालाय मृत्यूचा मार्ग
कल्याण मुरबाड राष्ट्रीय महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच आहे. ज्या ठिकाणी हा भीषण अपघात झाला. याच ठिकाणी या ३ ते ४ महिन्यात १० हून अधिक अपघाताच्या घटना घडून यात ८ ते ९ जणांचा मृत्यू झाल्याचे स्थानिक नागरिक देशमुख यांनी सांगितले. अपघाताची मालिका थांबवावी यासाठी अपघात क्षेत्र असलेल्या या मार्गावर गतिरोधक टाकण्याची मागणी केली आहे.