ठाणे - पान टपरी चालविणारा चालक आपल्या प्रेम प्रकरणात अटकाव ठरत असल्याच्या संशयातून प्रियकराने दोन मित्रांच्या मदतीने त्याचा धारदार सुऱ्याने खून केल्याची धक्कादायक घटना घडली. ही घटना डोंबिवली पश्चिमेकडील मोठागाव परिसरात घडली. राकेश रामहरी यादव (वय 28 वर्षे) असे खून झालेल्या पान टपरी चालकाचे नाव आहे. तर खूनप्रकरणी प्रियकर गणेश भोईर आणि त्याचे साथीदार यश जाधव आणि रवी खिल्लारे या तीन मारेकऱ्यांना विष्णूनगर पोलिसांनी अटक केली आहे.
हेही वाचा - अंघोळीसाठी गेलेल्या तरूणाचा कामवारी नदी पात्रात बुडून मृत्यू
याबाबत विष्णूनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मुणगेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, राकेश यादव याची मोठागांव चौकात पान टपरी आहे. राकेश याचा मित्र शिवप्रसाद सोनी हा मोठागाव येथे राहतो. सोनी यांची मुलगी स्नेहा हिचे गणेश भोईर हीच्याशी प्रेमसंबंध होते. गणेश हा यशवंत प्लाझा येथे हाऊस किपिंगचे काम करतो. स्नेहा आणि गणेश यांचे प्रेम प्रकरण मृत राकेश याला समजले आणि त्यांनी स्नेहाचे वडील शिवप्रसाद सोनी यांना सांगितले. हे समजताच शिवप्रसाद सोनी यांनी स्नेहाला मूळगावी उत्तरप्रदेश येथे पाठविले. ही गोष्ट आरोपी प्रियकर गणेश भोईर याला समजताच तो खवळला. आपल्या प्रेम प्रकरणात अटकाव करणाऱ्या पान टपरी चालक राकेशचा काटा काढण्याचे गणेश याने ठरविले.
हेही वाचा - महाडमध्ये चोरट्यांनी कांद्यावर मारला डल्ला
पहाटे आडीच वाजता गणेश भोईरने त्याचे साथीदार यश जाधव आणि रवी खिल्लारे यांच्यासह राकेश यादव याला ठार मारण्यासाठी त्याच्या घरी गेला. तेथे दोघांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली. त्यावेळी गणेश याने कमरेला खोचलेला धारदार सुरा काढून राकेशचा गळा चिरला. राकेश हा रक्ताच्या थारोळ्यात तडफडू लागताच गणेश आणि त्याच्या साथीदारांनी तेथून पळ काढला. या घटनेनंतर रहिवासी जागे झाले. राकेश याला रुग्णालयात नेले असता त्याला डॉक्टरांनी मृत घोषीत केले. या घटनेची माहिती शेजारी राहणाऱ्या यशवंत रामहरी यादव यांनी विष्णूनगर पोलीस ठाण्यात दिल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा करत तपास सुरु केला. त्यांनतर काही तासातच आरोपी प्रियकर गणेश भोईर आणि त्याच्या दोन्ही साथीदारांना पोलिसांनी अटक केली.