ठाणे - उल्हासनगरात डेंग्यूने पहिला बळी घेतला आहे. संदेश वीरेंद्र पाल (वय-१८) असे डेंग्यू आजाराने मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. ही घटना कॅम्प ३ मधील शांतीनगर, दत्तवाडी परिसरात घडली आहे. डेंग्यूचा हा पहिलाच बळी असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
उल्हासनगर महापालिका आयुक्त व महापौर शहरात स्वच्छता अभियान युद्धपातळीवर राबविण्यात येत असल्याचे सांगत असले, तरी शहरात सर्वत्र घाणीचे साम्राज्य निर्माण झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे शहरात विविध साथीचे आजार पसरू लागले आहेत.
तीन दिवसांपूर्वी संदेश याची प्रकृती अचानक बिघडली होती, त्यामुळे त्याला खासगी रुग्णालयात दाखल केले होते. मात्र, या ठिकाणी दोन दिवस उपचार घेऊनही प्रकृतीत सुधारणा होत नसल्याने कुटुंबीयांनी त्याला सायन रुग्णालयात हलवले होते. परंतु, बुधवारी रात्री संदेश याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
डेंग्यूच्या आजाराने संदेशचा मृत्यू होऊनही महापालिका प्रशासनामधील एकही अधिकारी तसेच सत्ताधारी यांना अद्यापही या घटनेची माहिती नसल्याने परिसरातील नागरिक संताप व्यक्त करत आहेत.