ठाणे - मुंबई-नाशिक महामार्गावर खर्डी जवळील चांदे गावाजवळ मध्यरात्रीच्या सुमाराला कार व दुचाकीचा भीषण अपघात झाला. यात दुचाकी चालवणाऱ्या मुलाचा जागीच मृत्यू झाला. तर दुचाकीवर मागे बसलेली त्यांची आई गंभीर जखमी झाली आहे. काशिनाथ चौधरी (वय ३५) असे मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे. तर त्यांची आई कुसुम चौधरी (वय ५५) गंभीर जखमी झाल्याने त्यांच्यावर शहापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, काशीनाथ चौधरी हे आपली आई कुसुम चौधरी यांच्यासह दळखन (खर्डी) येथील हळदी समारंभ करून दुचाकीवरून त्यांच्या घरी (कुकांबे) जात होते. त्यावेळी मध्यरात्रीच्या सुमाराला त्यांच्या दुचाकीला नाशिककडून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या वॅगणर कारने जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाला. याचवेळी घोटी येथील आपला नियोजित कार्यक्रम आटपून आमदार पांडुरंग बरोरा शहापूरकडे परतत असताना त्यांनी घटनास्थळी थांबून तत्काळ खर्डी पोलीस ठाणे व उपजिल्हा रुग्णालयात अपघाताची माहिती दिली.
अपघाताची भीषणता पाहून क्षणाचाही विलंब न लावता त्यांच्या स्वतःच्या वाहनातून अपघातग्रस्तांना उपजिल्हा रुग्णालयात आणले. मात्र, येथील डॉक्टरांनी काशीनाथ चौधरी यांना मृत घोषित केले व त्यांच्या आई कुसुम चौधरी गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. यावेळी आमदार पांडुरंग बरोरा यांनी दाखवलेल्या प्रसंगावधनामुळे एक महिलेचा जीव वाचवण्यात मदत झाली.