नवी मुंबई - चार दिवसांपूर्वी तळोजा औद्योगिक वसाहती शेजारील नागझरी गावाजवळ 65 वर्षीय वृद्धेची हत्या झाली होती. या हत्येप्रकरणी नवी मुंबई पोलीस दलाच्या गुन्हे प्रकटीकरण शाखा युनिट 2च्या पथकाने एका परप्रांतीय मजुराला अटक केली आहे. हत्येनंतर संबंधित वृद्धेच्या अंगावरील दागिने चोरीला गेल्याचा बनाव रचण्यात आला होता. मात्र पोलिसांनी हा बनाव उघडकीस आणत संबंधिताला अटक केली. रविवारी नागझरी गावालगत असलेल्या खाणीमध्ये सकाळी शकुंतला ठाकुर या कपडे धुण्यासाठी गेल्या होत्या. त्या घरी न परतल्याने त्यांची शोधाशोध सुरू झाली. अखेर खाणीणीमध्ये शकुंतला यांचा मृतदेह दगडाने ठेचलेल्या अवस्थेत सापडला होता.
कपडे धुण्यासाठी गेलेल्या महिलेची दगडाने ठेचून हत्या
तळोजा नागझरी गावातील शकुंतला ठाकुर (65) या कपडे धुण्यासाठी गावाजवळ असलेल्या खाणीमध्ये गेल्या होत्या. यावेळी अज्ञात व्यक्तीने डोक्यात दगड घालून त्यांची निर्घृण हत्या केली होती. हत्या केल्यानंतर आरोपीने या वृद्धतेच्या गळ्यातील सोनसाखळी आणि कानातील सोन्याचे जोड यांची चोरी केली होती.
शिव्या दिल्याच्या रागातून हत्या
घटनेच्या पंधरा दिवस आधी शकुंतला ठाकुर या खाणीमध्ये कपडे धूत असताना, आरोपी तेथे आंघोळ करत होता. त्यावेळी मृत महिला व आरोपी यांच्यामध्ये वाद झाला होता. त्यावेळी मृत महिलेने आरोपीला शिव्या दिल्या होत्या. याचा राग मनात धरून आरोपीने संधी मिळताच शकुंतला ठाकुर यांची हत्या केली. दरम्यान या प्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल होताच, पोलिसांनी घटनेचा शोध सुरू केला. अखेर या प्रकरणी आरोपीला ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आले आहे. विजयकुमार मुनेश्वर मंडल असे या आरोपीचे नाव आहे. आरोपी मागील दहा वर्षांपासून तळोजा परिसरामध्ये लहानमोठे भंगार वेचण्याचे काम करत असल्याचे समजले. विजय हा मूळ नेपाळ येथील रहिवाशी आहे.