नवी मुंबई - राजधानी मुंबईमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच आहे. आत्तापर्यंत नवी मुंबई उपनगरात 74 कोरोनाबाधित रूग्ण आढळले आहेत. मंगळवारी कोरोनाचे 5 नवीन रुग्ण आढळले आहेत. नवी मुंबईत आत्तापर्यंत 1 हजार 206 लोकांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे. यामध्ये 903 व्यक्तींचे कोरोनाचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत. 23 रुग्ण आत्तापर्यंत कोरोनामुक्त झाले आहेत तर 229 जणांचे अहवाल येणे बाकी आहेत, अशी माहिती आयुक्त आण्णासाहेब मिसाळ यांनी दिली.
17 एप्रिलला दिवागाव ऐरोली येथील तीन जणांना कोरोनाची लागण झाली होती. त्यातील एका व्यक्तीच्या पत्नीला (43) आणि मुलाला (22) तसेच जवळच्या संपर्कातील व्यक्तीला कोरोनाची लागण झाली असल्याचे मंगळवारी आलेल्या अहवालात स्पष्ट झाले. करावे गाव येथील मुंबई शिवडी येथे वॉर्डबॉय म्हणून कार्यरत असणाऱ्या 36 वर्षीय व्यक्तिचेही कोरोना चाचणीचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. घणसोली येथील 36 वर्षीय तरुणांचे देखील कोरोनाचे अहवाल पॉझिटिव्ह आले. या सर्वांना नवी मुंबई महानगरपालिकेच्या वाशी येथील रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.