ठाणे - शहरात दिवसेंदिवस कोरोनाबाधितांची संख्या वाढत चालली आहे. मात्र, ठाणेनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत अद्याप एकही कोरोनाबाधित रुग्ण नसल्याने येथील पोलिसांचे कौतुक केले जात आहे.
विशेष म्हणजे या पोलीस स्थानकाच्या हद्दीत भाजीपाला, मसाले, कांदे-बटाट्याची घाऊक बाजारपेठ आहे. त्यामुळे याठिकाणी दररोज मोठ्या प्रमाणात नागरिकांची आणि व्यापाऱ्यांची ये-जा असते. मात्र, ठाणेनगर पोलीस स्थानकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामराव सोमवंशी यांच्या नेतृत्वाखाली सोशल डिस्टनसिंगच्या माध्यमातून नागरिकांमध्ये अंतर ठेऊन कोरोनाची साखळी तोडण्यात यश मिळवले. येथे कार्यरत असणाऱ्या चार पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा झाली होती. मात्र, त्याचा संसर्ग ते राहत असलेल्या पोलीस क्वार्टर्समधून झाल्याचे त्यांनी सांगितले. सकाळी भरणाऱ्या या घाऊक बाजारपेठेत येणाऱ्यांवर पोलिसांची करडी नजर असते व तोंडावर मास्क आणि रुमाल नसल्यास ग्राहकांना सरळ घरी पाठविण्यात येते, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक सोमवंशी यांनी दिली. ठाणे शहरात कोरोनाचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव होत असला तरी आपल्या कार्यक्षेत्रात त्याला शिरकाव करू देणार नाही, असा निर्धार असल्याचे ते म्हणाले.