नवी मुंबई - पनवेल तालुक्यात मंगळवारी नव्या नऊ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. यात पनवेल महापालिका क्षेत्रात 8 तर ग्रामीण भागात 1 नवीन रुग्ण आढळला आहे. दिलासादायक बाब म्हणजे मंगळवारी तालुक्यातील 19 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यापैकी पनवेल महापालिका क्षेत्रातील 17 तर ग्रामीण भागातील 2 रूग्णांचा समावेश आहे.
मंगळवारी आढळलेल्या रुग्णांमध्ये पनवेलमधील 3, कामोठ्यातील 2 तसेच कळंबोली, नावडे वसाहत आणि रोहिंजण वसाहतीतील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. आजपर्यंत महापालिका क्षेत्रात एकूण 401 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी 234 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. तर, 18 जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या पनवेल महापालिका क्षेत्रात 149 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. पनवेल ग्रामीणमधील एकूण 163 कोरोनाबाधित रुग्णांपैकी आतापर्यंत 104 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. तर, 5 जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या पनवेल ग्रामीणमध्ये कोरोनाचे 54 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.
नवीन पनवेलमध्ये कोरोनाचे 3 नवे रूग्ण आढळले आहेत. यात इंद्रायणी सोसायटी येथील एकाच कुटुंबातील 2 व्यक्तींना कोरोनाची लागण झाली आहे. या कुटुंबातील कुटुंब प्रमुखाला याआधीच कोरोनाची लागण झाली होती. त्यांच्या संपर्कातूनच या दोघांना संसर्ग झाल्याचा प्राथमिक अहवाल आहे. तसेच नवीन पनवेल सेक्टर-2 येथील 32 वर्षीय महिलेलाही कोरोनाची लागण झाली आहे.