ठाणे - उल्हासनगरातील शासकीय मध्यवर्ती रुग्णालयात जन्मतः मेंदूच्या आजाराने ग्रासलेल्या ८०० ग्रॅम वजनाच्या नवजात बालिकेवर अवघड शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडली. डॉक्टरांनी आपल्या चिमुकलीला जीवनदान दिल्याने, दाम्पत्याला अत्यानंद झाला आहे.
उल्हासनगरात राहणाऱ्या रचना राहुल परब या गर्भवती महिलेने एका मुलीला जन्म दिला. त्या मुलीचे जन्मतः वजन केवळ ८०० ग्रॅम इतके असून त्यातच तिला मेंदूचा गंभीर आजार झाला होता. या आजारामुळे मेंदूवर प्रचंड ताण येत असल्याने, नवजात मुल दगावण्याची शक्यता होती, मात्र, डॉक्टरांनी अवघड अशी शस्त्रक्रिया करुन त्या चिमुकलीला जीवनदान दिले आहे.
दरम्यान, नवजात बालिकेवर नवी मुंबईच्या खारघर येथील सुपर स्पेशालिस्ट या खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र येथील भरमसाठ खर्च परब दाम्पत्यास परवडणारा नव्हता. त्यामुळे त्यांनी उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात दाखल केले होते. मध्यवर्ती रुग्णालयात नवजात मुलीवर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली आणि मुलीचे वजन देखील सामान्य होत असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली.
नवजात बालिकेवर उपचारासाठी डॉ. रविंद्र रोकडे, डॉ. जाफर तडवी तसेच वैद्यकीय कर्मचारी मंगला खडसे, सुमन गोविंदे , उषा राठोड व अन्य कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले.